

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : अॅड. गुणरत्न सदावर्ते तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांच्या मार्गावर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक अर्जुनप्पा साळुंखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत निषेध केला.
अॅड. सदावर्ते तुळजाभवानी देवीचे दर्शन झाल्यानंतर बुधवारी (दि. १८) दुपारी चारच्या सुमारास प्रशासकीय इमारतीमधून बाहेर पडण्याअगोदर मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात भूमिका व्यक्त केली. त्यामुळे त्यांना पोलिसांनी मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, राज्य समन्वयक अर्जुनप्पा साळुंखे यांनी आपली भूमिका न बदलता काही अंतरावर गुणरत्न सदावर्ते यांची येण्याची वाट पाहिली आणि ते आल्यानंतर मराठा समाजाचे नुकसान करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांचा आम्ही निषेध करत आहोत, अशा शब्दांमध्ये निषेध केला व घोषणाबाजी केली.
यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना घोषणाबाजी करण्यापासून थांबवले. कोणताही अनुचित प्रकार यानिमित्ताने झाला नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलताना साळुंखे यांनी गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाची खूप नुकसान केले आहे. अनेक हुतात्मे झालेल्या तरुणांचा बळी या व्यक्तीने घेतला आहे. विद्यार्थी आणि शेतकरी यांनी आत्महत्या केल्या आहेत. या सर्व झालेल्या प्रकाराला ही व्यक्ती जबाबदार आहे, असा आरोप केला.