परंडा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले

आ. सावंत, माजी आ. मोटे यांच्या हालचालींकडे लक्ष
Dharashiv Political News
परंडा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले File Photo
Published on
Updated on

Political developments accelerate Paranda constituency

अब्बास सय्यद

भूम: परंडा मतदारसंघामध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी आमदार राहुल मोटे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाची साथ सोडून अजित पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा एका बाजूला असताना दुसरीकडे शिंदे शिवसेनेचे आ. तानाजी सावंत हेही पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. या सगळ्या गदारोळात मोटे यांनी घड्याळ हाती बांधलेच तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा या मतदारसंघातील पुढचा चेहरा कोण असणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका जवळ आल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Dharashiv Political News
Ramaling : भाविकांचे आकर्षण ठरतेय रामलिंग अभयारण्य

दुसरीकडे, शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार तानाजी सावंत यांच्याबद्दलही चर्चा सुरू आहे. गेल्या निवडणुकीत निसटता विजय मिळाल्याने आणि आरोग्याच्या कारणामुळे सावंत यांनी मतदारसंघाकडे काही काळ दुर्लक्ष केले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. मात्र, नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात तानाजी सावंत यांची भेट घेतल्याने शिवसैनिकांना नवी ऊर्जा मिळाली आहे. शिंदे यांनी सावंत यांना कोणता कानमंत्र दिला आहे, याबद्दल शिवसैनिकांत चर्चा झडत आहेत.

दोन नेत्यांभोवती मतदारसंघाचे राजकारण

सध्या परंडा मतदारसंघाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू दोन प्रमुख नेते आहेत माजी मंत्री तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे. राहुल मोटे यांचा अजित पवार गटात प्रवेश झालाच तर दोन्ही नेते सत्ताधारी गटात असणार आहेत. या दोन नेत्यांव्यतिरिक्त, भाजपचे नेते सुजितसिंह ठाकूर यांचाही मतदारसंघात प्रभाव आहे. मात्र, जनमानसात भाजपचा जनाधार तुलनेने कमी असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे, काँग्रेसकडे परंडा मतदारसंघात सक्षम नेतृत्वाचा अभाव आहे.

Dharashiv Political News
Dharashiv News : जटा शंकर मंदिरात भाविकांची गर्दी

या पक्षाकडे नेते आहेत, पण त्यांना पक्षाकडून ताकद मिळत नसल्याने हे सध्या बॅकफूटवर आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षालाही मतदारसंघात मोठे स्थान आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव रणजित पाटील यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी आल्याने हा पक्षही येथे मजबूत आहे. परंपरेनुसार, परंडा मतदारसंघात तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतात. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि अजित पवार गट तानाजी सावंत यांच्या बाजूने असतील, तर महाविकास आघाडीतील पक्ष त्यांच्या विरोधात असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये रंगत येणार आहे.

राहुल मोटे यांची चुप्पी

दरम्यान, मागील काही दिवसांपासू माजी आ. मोटे यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा झडत असताना मोटे यांनी मात्र यावर काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. सहा वर्षांपूर्वी त्यांच्या बाबतीत भाजप प्रवेशाच्या अशाच बातम्या व्हायरल झाल्यानंतर त्यांनी तातडीने खुलासे करत भाजप प्रवेशाचा इन्कार केला होता. यावेळी अजून तरी त्यांची स्पष्ट भूमिका समोर आलेली नसली तरी कार्यकर्त्यांच्या राजकीय वर्तुळात मात्र त्यांच्या पक्षांतराच्या अटकळी बांधल्या जात आहेत. येत्या मंगळवारपर्यंत कोणत्या हालचाली घडतात याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news