

Dharashiv Crowd of devotees at Jata Shankar temple
उमरगा पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील मुळज येथील ग्रामदैवत असलेल्या हेमाडपंथी मंदिरात श्री जटाशंकराच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. श्रावण महिन्यात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाची मांदियाळी असते.
तालुक्यातील मुळज येथे पूर्वेला एक किमी अंतरावर जटाशंकराचे हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराचा गाभारा सहा मोठ्या दगडी खांबावर सुंदर कलाकुसर करून बांधण्यात आला आहे. गाभार्याच्या प्रवेश द्वारावर गज लक्ष्मीची कोरीव सुंदर मुर्ती आहे. तर चौकटीवर रेखीव कलाकुसरीने वेगवे गळे नक्षीकाम केलेले आहे. गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग असून शिवलिंगाच्या पाठीमागील बाजूला एका अखंड दगडी शिळेवर नंदीवर बसलेली शिव पार्वतीसह गणपतीची मुर्ती आहे. शंकराच्या उजव्या हातात त्रिशूल, डाव्या हातात डमरू व डोक्यावर लांब लचक जटा आहेत. तर पार्वती च्या डाव्या बाजूला गणपती विराजमान असलेली ही मुर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते.
मंदिरासमोर अखंड पाषाणाचा मोठा नंदी, मंदिर परिसरात विविध देवी देवतांच्या मुर्त्या आहेत. उत्तरेला शिवलिंग आकाराचे तीर्थकुंड, ईशान्य दिशेला पुरातन वृक्षाखाली नृसिंहाचे मंदिर आहे. पश्चिमेला छोट्या मंदिरात शिवलिंग, वायव्येला चर्मकार समाजातील भक्त तसेच विविध महंताची समाधी स्थळ आहेत.
मंदिरासमोर वीस फुट उंचीच्या दगडी दीपमाला व निसर्गरम्य वातावराणामुळे येथे येणाऱ्या भाविकांचे मन प्रसन्न होते. या मंदिरा बाबतीत श्रीराम वनवासाला निघाल्या नंतर मंदीर परिसरात थांबून कामनापूर्ती डोंगरावरून पुढे कर्नाटक राज्यातील अमृतकुंड येथे गेले असल्याची आख्यायिका सांगितली जाते.
त्यामुळे येथे प्रत्येक महिन्यातील सोमवार, अमावस्या, पौर्णिमा, महाशिवरात्री, देवस्थान यात्रा व संपुर्ण श्रावण महिन्यात हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन, बिल्वार्चन सोहळा, तसेच दर सोमवारी महापुजा, महाआरती, अभिषेक व प्रसाद वाटपासह विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाची मांदियाळी असते. प्राचीन काळापासून देवस्थानची जर वर्षी गुढीपाडव्याला मानकरी असलेल्या सोयराप्पा घराण्याच्या हस्ते श्रींच्या काठी प्रतिष्ठापणेने पंधरा दिवस यात्रा चालते. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या तिर्थक्षेत्राला महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.