

पाथरी (धाराशीव) : पाथरी - सोनपेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 वर मंगळवारी (दि.21) सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास बसखाली चिरडून दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकल थेट एसटी बसखाली अडकून दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
पाथरी आगाराची एसटी (एमएच 06/ एस 8790) सकाळी सोनपेठकडे जात होती. दरम्यान सोनपेठ येथून पाथरीकडे येणारी मोटारसायकल (एमएच 22/ एके 1583) ही सय्यद सादात दर्गा जवळ आली असता बसने मोटारसायकलला धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील लतीफ अहमद पठाण ( 56) आणि शेख अन्वर शेख नूर (39, दोघेही रा.इंदिरानगर,पाथरी) हे जागीच ठार झाले.
अपघातानतंर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेली. सुदैवाने बसमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पाथरीचे पोलिस निरीक्षक महेश लांडगे, पोलिस नाईक सुरेश कदम व अन्य कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.