

Omraje Nimbalkar emotional post : राज्यातील बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा सत्र न्यायालयाचा निकाल शनिवारी (दि.२०) जाहीर झाला. या निकालानंतर आज (दि. २१) धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली एक अत्यंत भावनिक पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत आली आहे. फादर्स डेनिमित्त आपल्या वडिलांच्या (पवनराजे निंबाळकर) आठवणीत आणि न्यायालयीन लढाईवर भाष्य करणारी एक व्हिडिओ रील ओमराजे निंबाळकर यांनी शेअर केली आहे.
फादर्स डेनिमित्त ओमराजे निंबाळकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांचे दिवंगत वडील पवनराजे निंबाळकर यांच्यासोबतचा त्यांचा जुना फोटो दिसतो. या व्हिडिओसोबत त्यांनी "भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी" #happyfathersday असं लिहिलं आहे. ओमराजेंनी ही रील पोस्ट करताच त्यांच्या समर्थकांनी आणि धाराशीवमधील नागरिकांनी त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. "आम्ही तुमच्या पाठीशी आहोत," अशा भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये ओमराजे निंबाळकर हे अतिशय भावूक अवस्थेत वडिलांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होताना, तसेच पवनराजे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना दिसत आहेत.
एकीकडे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल लागल्यानंतर निंबाळकर कुटुंबाला अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष सचिव वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी तातडीने पुण्यात जाऊन ओमराजे निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. "ओमदादा आणि त्यांच्या परिवाराला या निकालामुळे मोठा धक्का बसला असून, त्यांच्या सुख-दुःखात भागीदार होण्यासाठी आम्ही त्यांची विचारपूस करायला गेलो होतो," असे वरुण सरदेसाई यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले.