

धाराशिव : भीमाशंकर वाघमारे
कॉंग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांची २००६ मध्ये हत्या झाली. त्यानंतर जिल्ह्यात, विशेषतः धाराशिव, कळंब तालुक्यातील राजकीय वातावरण तापले. त्याला संदर्भ होता २००४ च्या विधानसभा निवडणुकीचा. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात पवनराजेंनी निवडणूक लढवली होती. त्यात केवळ ४८४ मतांनी डॉ. पाटील विजयी झाले होते.
अर्थात २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाली. त्यात उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ तुळजापूर आणि कळंब मतदारसंघांत विभागला गेला. कळंबचे नाव बदलून उस्मानाबादचे नाव लागले. तशाही स्थितीत पवनराजेंच्या खुनाची सहानुभूती मिळवत त्यांचे पुत्र ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी तत्कालीन महसूल राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांचा १६ हजार ९७४ मतांनी पराभव केला.
मतदारांची सहानुभूती पूर्णपणे ओमराजेंना मिळाल्याने ते आमदार झाले. शिवसेनेच्या उमेदवारीवर त्यांनी देदीप्यमान यश मिळविले होते. पुढे काळ सरकत राहिला. जिल्हा परिषदेतही काँग्रेसच्या मदतीने ओमराजे सत्तेत होतेच. दरम्यानच्या काळात म्हणजे २००९ मध्येच खासदार झाल्यानंतर डॉ. पाटील यांना पवनराजे खूनप्रकरणात अटक झाली होती. कालांतराने ते जामिनावर आले.
आमदारकीच्या पाच वर्षांच्या कालखंडात ओमराजे विधानसभेत भाषणे करीत राहिले. मतदारसंघाचे प्रश्न मांडत राहिले. २०१४ मध्ये अवघ्या राज्यात मोदी लाट असताना धाराशिव विधानसभेत मात्र त्यांचा १० हजार ८०६ मतांनी पराभव झाला. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी ओमराजेंनी पाच वर्षांत काहीच केले नाही हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यात मतदारांनी आ. पाटील यांना विजयी केले. त्यानंतर २०१९ मध्ये स्टैंडिंग खा. प्रा. रवी गायकवाड यांना डावलून ओमराजेंना पक्षाने उमेदवारी दिली. त्यात ते १ लाख २७ हजार मतांनी विजयी झाले. मोदी लाटेचा त्यांना मोठा फायदा झाला. तर २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लाटेत खा. ओमराजे पुन्हा एकदा लोकसभेत पोहोचले.
या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचीही मते त्यांना मिळाली. याशिवाय पदावर पायउतार व्हावे लागलेल्या उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूतीही मतदारांनी व्यक्त केली होती. हे सांगण्याचे कारण म्हणजे प्रत्येक निवडणुकीत त्या त्या वेळच्या लाटेचा फायदा ओमराजेंना झाला आहे. हा विसर त्यांच्या समर्थकांना पडला तर आगामी काळात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ओमराजेंचा प्लस पॉईंट म्हणजे उत्कृष्ट वक्तृत्व शैली आणि मतदारांच्या सतत संपर्कात राहणे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची इमेज अतिशय चांगली आहे.
२०२४ मध्ये ३ लाख २९ हजारांचे मताधिक्य त्यांना मिळाले. तेथूनच गणिते बिघडायला सुरुवात झाली. पुढे दोन वर्षांत जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका झाल्या. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षित बहुमत मिळाले नाही. नेमके याच अपयशावर बोट ठेवत ओमराजेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे. इतके काम करूनही, जनतेसाठी २४ तास उपलब्ध असूनही मशालीला मतदारांनी का नाकारले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वस्तुतः लोकसभेला महाविकास आघाडी एकत्र होती. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांना महाविकास आघाडी एखाद-दुसरा अपवाद वगळता जिल्ह्यात कुठेच झाली नाही. त्यामुळे मतविभागणीत भाजप, शिंदेंची शिवसेना विजयी झाली. ही बाब मात्र ओमराजे समर्थक दुर्लक्षित करीत आहेत, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.
आता ओमराजेंनी निर्णय घेतला आहे. जाहीरही केला आहे. आता त्यांनी २०२९ च्या लोकसभेची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदेंचे छत्र डोक्यावर असले तरी यापुढची वाटचाल जिल्ह्यात दिसते तितकी सोपी नाही हेही तितकेच खरे आहे.
२०१९ च्या निवडणुकीत प्रा. गायकवाड यांची उमेदवारी कापण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, असा एका गटाचा अजूनही आरोप आहे. तोच गट उमरगा, लोहारा तालुक्यात शिंदेंच्या शिवसेनेत ताकदवान आहे. तुळजापूर, कळंब, धाराशिव तालुक्यात आ. राणाजगजितसिंह पाटील यांचेही वर्चस्व आहे. आ. पाटील आणि खा. राजेनिंबाळकर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. यांना आधारच राहतो तो केवळ भूम, परंडा, वाशी विधानसभा मतदारसंघाचा.
याशिवाय ठाकरेंची शिवसेनाही आता गप्प बसणार नाही. स्पेस निर्माण झाल्याने जिल्ह्यातील इतर पक्षांतील काही नेतेही त्या पक्षात प्रवेशाची चाचपणी करीत आहेत. निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी ही तर मतपेटीतूनही दिसणार आहे. पुढच्या दोन-अडीच वर्षांच्या वाटचालीत असे आव्हानांचे अनेक अडथळे आहेत. ते खा. ओमराजे पार करून स्वतःला कसलेला राजकीय नेता म्हणून सिद्ध करतात की 'पक्षांतर करून पायावर धोंडा मारून घेतला' या चर्चेला सत्यात उतरवणार, याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.
आता ओमराजेंनी निर्णय घेतला आहे. जाहीरही केला आहे. आता त्यांनी २०२९ च्या लोकसभेची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदेंचे छत्र डोक्यावर असले तरी यापुढची वाटचाल जिल्ह्यात दिसते तितकी सोपी नाही हेही तितकेच खरे आहे. २०१९ च्या निवडणुकीत प्रा. गायकवाड यांची उमेदवारी कापण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, असा एका गटाचा अजूनही आरोप आहे.