

नळदुर्ग : येणाऱ्या पावसाळ्यात अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता व हवामान खात्याने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने बोरी धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करावे, अशी मागणी नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे आणि तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बोरी धरणातून तुळजापूर, नळदुर्ग, अणदूर या शहरांसह मानेवाडी, चिकुंद्रा, मूरटा आदी ग्रामीण भागांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या पाण्याची टंचाई जाणवत नसली तरी अल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा पावसाळा सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सध्या बोरी धरणात 30 टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नगराध्यक्षांनी म्हटले आहे. तसेच धरणाच्या कालव्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने उपलब्ध साठ्यावर ताण येत असून पुढील वर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, अल निनोच्या प्रभावामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खाते व विविध संस्थांनी वर्तविली आहे.
नळदुर्ग आणि तुळजापूर या दोन्ही शहरांमध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने येथील तरल लोकसंख्याही अधिक आहे. त्यामुळे भविष्यातील गरज लक्षात घेऊन बोरी धरणातून होणारा पाण्याचा उपसा तातडीने थांबवून उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीही नळदुर्ग नगरपालिकेने 25 मे 2026 रोजी बोरी धरणातील पाणी आरक्षित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. दरम्यान, नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी सांगितले की, अल निनोच्या संभाव्य परिणामामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाणी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी बोरी धरणातून होणारा पाणी उपसा थांबविण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.