

Muslim community rejects Dolby, Banjo
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील मुस्लिम समाजाने धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये डीजे, डॉल्बी आणि बँजो वाजविण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी (रहे.) दर्गा येथे १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा तसेच संबंधित व्यक्तीचा किंवा त्याच्या नातेवाइकांचा मृत्यू झाल्यास नमाज-ए-जनाजामध्ये सहभागी न होण्याचा इशाराही देण्यात आला.
या बैठकीला शहरातील उलेमा, मौलाना, सामाजिक नेते आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करताना मोठ्या आवाजातील वाद्यांच्या वापराचा मुद्दा उपस्थित झाला. धार्मिक, सामाजिक तसेच अन्य कोणत्याही कार्यक्रमात डीजे, डॉल्बी आणि बँजोचा वापर करू नये, असे ठरविण्यात आले.
मोठ्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना त्रास होतो. त्यामुळे कार्यक्रम साजरे करताना इतर नागरिकांच्या अडचणींचाही विचार करावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. तसेच दारू पिऊन गोंधळ घालणे, नाचगाण्याच्या नावाखाली इतरांना त्रास देणे आणि सामाजिक शांतता बिघडविणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यावरही भर देण्यात आला. समाजातील प्रत्येक व्यक्तीने सामूहिकरीत्या घेतलेल्या निर्णयाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. धार्मिक मूल्यांचे पालन, सामाजिक शिस्त आणि शांतता राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले.
सामाजिक बहिष्काराचा इशारा
धाराशिव शहरातील मुस्लिम समाजाच्या बैठकीत डीजे, डॉल्बी आणि बँजो न वाजविण्याचा निर्णय घेण्यात आला. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ठरले आहे. तसेच नियम मोडणाऱ्या व्यक्तीचा किंवा त्याच्या नातेवाइकांचा मृत्यू झाल्यास नमाज-ए-जनाजामध्ये सहभागी न होण्याचा इशाराही देण्यात आला. या निर्णयाची समाजात कशा प्रकारे अंमलबजावणी होते, याकडे लक्ष लागले आहे.