

Medical College Trainee doctor beaten up
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकाने प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या गळ्याला कत्ती लावून मारहाण झाल्याचा प्रकार म्हणजे पोलिसांचा वचक कमी झाल्याचे बळढळीत उदाहरण ठरले आहे. हा कत्ती घेऊन फिरणारा तरुणही कंत्राटी कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोनीकेत उर्फ स्वप्नील बाबासाहेब राऊत (रा. भिमनगर, धाराशिव) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशु सत्यनारायण व्यास (वय २६, रा. जोधपुर, राजस्थान) हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत. दि. २ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते १०.४५ च्या सुमारास आरोपी रोनीकेत राऊत आणि त्याचा साथीदार यांनी डॉ. व्यास यांना 'गाडीला कट का मारला' या क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ केली, त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी कोयत्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर डॉ. व्यास यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मारहाणीचे कारण काय..?
शासकीय महाविद्यालयातच हा आरोपी कंत्राटी कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. त्याने ज्या पद्धतीने या डॉक्टरला मारहाण केली आहे ते पाहता तो सराईत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच तुंगनालाय परिसरात तो शर्टच्या आत कत्ती घेऊन बेमालूम फिरत आहे. त्यामुळे त्याची नियुक्ती होताना त्याची पार्श्वभूमी तपासली होती का, हा प्रश्न होऊ लागला आहे. पोलिसांनीही या घटनेची पाळेमुळे शोधून काढून यातील आरोपीना कठोर शिक्षा होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पूर्णवेळ अधिष्ठाता हवा
या महाविद्यालयाला पूर्णवेळ अधिष्ठाता नाहीत. सध्या लातूर येथील शासकीय महाविद्यालयातील डॉक्टरकडे प्रभारी पदभार आहे. त्यामुळे प्रशासनावर वचक नसल्याचे या घटनेवरून दिसत आहे. या कॉलेजमध्ये देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे एखाद्या कंत्राटी कर्मचा-याच्या अशा गुंडशाही वर्तनामुळे धाराशिवची प्रतिमा मलिन होणार आहे. या पार्श्वभूमीवर येथे पूर्णवेळ अधिष्ठाता नियुक्त होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.