

धाराशिव: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा आणि राजकीय प्रवासाचा गौरव करणारा ‘महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार’ हा विशेष काव्य गौरवग्रंथ लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, देशभरातील तब्बल १५६ दिग्गज आणि नवोदित कवींनी आपल्या कवितांमधून अजित पवार यांना काव्यांजली अर्पण केली आहे. त्यामुळे हा ग्रंथ साहित्य आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
या अभूतपूर्व काव्यसंग्रहाचे संपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गोरे यांनी केले आहे. विविध राज्यांतील कवींनी या ग्रंथात सहभाग नोंदवला असून महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, केरळ आणि गोवा येथील साहित्यिकांनी कवितांच्या माध्यमातून अजितदादांच्या कार्याला सलाम केला आहे.
या बहुप्रतीक्षित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा २९ मे २०२६ रोजी धाराशिव येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. साहित्य आणि समाजकारणाचा संगम घडवणारा हा सोहळा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
विशेष बाब म्हणजे, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या काव्य गौरवग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. एका लोकनेत्याच्या कार्यावर आधारित आणि साहित्यिकांनी सामूहिकरीत्या साकारलेल्या अशा प्रकारच्या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे.
या ग्रंथामध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे, प्रशासनातील त्यांची कार्यपद्धती, निर्णयक्षमता, विकासकामांतील भूमिका तसेच जनतेशी असलेले नाते या विविध पैलूंना कवितांच्या माध्यमातून उजाळा देण्यात आला आहे. त्यामुळे हा ग्रंथ केवळ काव्यसंग्रह न राहता, एका लोकनेत्याच्या कार्यप्रवासाचे साहित्यिक दस्तऐवजीकरण ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकाशन सोहळ्यासाठी राज्यभरातील साहित्यिक, कवी, विचारवंत आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. धाराशिवमध्ये साहित्यिकांची मोठी मांदियाळी जमणार असून, या कार्यक्रमाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.