

कळंब : अनुष्काच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजीभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळंब येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे चारही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आठवडी बाजार असल्याने शहरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तहसील प्रशासनाने आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेली अनुष्का किरण पाटोळे (वय 12) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आली होती. मात्र, आमची अवघ्या बारा वर्षांची मुलगी आत्महत्या करू शकत नाही. त्यामुळे ही आत्महत्या नसून शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनीच तिची हत्या केली असल्याचा गंभीर आरोप मयत मुलीच्या पालकांनी केला आहे. शवविच्छेदनानंतर लातूरचे पोलिस अधीक्षक यांनी मयत मुलीच्या अंगावर जखमा आढळल्याचे सांगितले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी जवाहर नवोदय विद्यालयातील दोन महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट व भादंवि कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही अनुष्काला अमानुष मारहाण करून तिचा खून केला असून आत्महत्या असल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
या घटनेचा सखोल व निष्पक्ष तपास करून शालेय प्रशासनावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसेच आरोपींना पाठीशी घालणाऱ्या लातूर जिल्हाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजीभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळंब येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे चारही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आठवडी बाजार असल्याने शहरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तहसील प्रशासनाने आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नेते भाई बजरंग ताटे, बालाजी उपरे, सतपाल बनसोडे, विठ्ठल ताटे, सुदीप देवकर, मोहन कसबे, दीपक कसबे, संतोष कसबे, शंकर ताटे, धनंजय ताटे, अशोक गायकवाड, संभाजी गायकवाड, सलमान मुल्ला, किरण गायकवाड, भीमा गायकवाड, मयूर गायकवाड, प्रदीप गायकवाड, मयूर कसबे, करण जाधव, बादल पाटोळे, सेवागिरी पाटोळे, मंदाकिनी बालाजीभाऊ गायकवाड यांच्यासह समाजबांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.