परमेश्वर पालकर
कळंब: अगोदरच निवडणूका कधी लागणार याची गेल्या दोन वर्षांपासून वाट बघणाऱ्या भावी नगरसेवकांचा जीव पक्षश्रेष्ठींनी आघाडी युतीवर आणखी शिक्कामोर्तब न केल्यामुळे टांगणीला लागला आहे. बोलता पण येईना आणि दुसऱ्या पक्षात जाता पण येईना अशी अवस्था भावींची झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठीं कधी निर्णय घेणार याकडे भावींचे लक्ष लागलेले आहे.
कळंब नगरपालिकेत कधी नव्हे अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आघाडी युती जागावाटप सर्वच परिस्थिती गोंधळात आहे. काही उमेदवारांना कामाला लागाचे आदेश दिल्याचे समजते तर काहींना सलाईनवर ठेवले आहे. कार्यकर्त्यांचे पक्षांतर होणार नाही याची काळजी दोन्ही बाजूकडून घेतली जात आहे. आणि फॉर्म माघार घ्यायच्या दिवसांपर्यंत श्रेष्ठी काळजी घेणार असे सध्या तरी दिसत आहे.
महायुती कडून सुनंदा शिवाजी कापसे यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अंतिम मानली जात आहे. त्यांनी आपला प्रचार सुध्दा सुरू केला आहे तर महाविकास आघाडीकडे मात्र इच्छूकांची संख्या जास्त असल्याने श्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर यांच्या पत्नी प्रा डॉ मिनाक्षी शिंदे यांनी सुद्धा प्रचाराला सुरुवात केली आहे. आघाडीकडून उमेदवारी नाही मिळाली तर त्या कायम उभा रहाणार की माघार घेणार की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष स्वतंत्र आखाड्यात उतरणार हे लवकरच दिसुन येईल. तसेच उबाठा सेनेकडून रश्मी मुंदडा, आशा भवर, धनश्री कवडे सारीका जाधव इच्छूक असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे कोण होणार फायनल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कळंब नगरपालीकेत महायुती करण्यासाठी भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी स्थानिक नेत्यांनी चर्चा करून मार्ग काढावा यासाठी गुरुवारी सुचित केले त्यानुसार कळंब मध्ये चर्चा पण झाली पण भाजप सेनेच्या वतीने दिलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने अमान्य सध्या तरी केलेला आहे परंतु आम्ही युतीसाठी तयार असल्याचे शिवसेनेचे नेते अजित पिंगळे यांनी सांगितले. व भाजप सेनेचे जागावाटप जवळ जवळ अंतिम झाल्याचे त्यांनी सांगितले.
इकडे भाजप सेनेची युती अंतिम टप्प्यात तर आघाडीकडेही कॉंग्रेस व उबाठा सेनेचे जागावाटप अंतिम झाल्याचे समजते परंतु दोन्ही कडे दोन्ही राष्ट्रवादीचे सुर जुळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी सुध्दा समाधान न झाल्यास एकत्रित येऊ शकतात असा अंदाज काही राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कळंब नगरपालीकेत तिरंगी लढत होऊ शकते.