

धाराशिव : लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देण्यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ७ डिसेंबर रोजी धाराशिव शहरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाच्या निमंत्रक व स्वागताध्यक्षपदी रवी कोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती तर्फे पत्रकार परिषद घेऊन या महामोर्चाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर, बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील, तसेच संदीप पाटील (लोहारा), स्वप्नील ढोले (बार्शी), गणेश (भूम) यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत रवी कोरे यांची महामोर्चाचे निमंत्रक व स्वागताध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महामोर्चाद्वारे लिंगायत समाजाने केंद्र आणि राज्य सरकारकडे आपल्या स्वतंत्र धर्म मान्यतेच्या मागणीसह शिक्षण, नोकरी, आरक्षण आणि सामाजिक न्यायाशी संबंधित अनेक मागण्या मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महामोर्चाची तयारी जोरात सुरू असून, जिल्हाभरातून आणि राज्यातील विविध भागांतून हजारो लिंगायत बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.