

शंकर बिराजदार
उमरगा : महायुतीच्या मंगळसूत्रावर निवडून येऊन २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्वाशी तडजोड करत काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीचा "राजकीय व्यभिचार" उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर गद्दारीचा खरा कलंक उद्धव ठाकरेनी लावला, असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी केला.
शहरातील शासकीय विश्रामगृहात रविवारी (दि २८) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि हिंदुत्व वाचवण्यासाठी संघर्ष केला असून त्यांच्यावरील गद्दारीचे आरोप हास्यास्पद आहेत. सचिन वाजेच्या माध्यमातून खंडणी गोळा करण्याचे गंदे धंदे बंद करून टाकले आहेत. त्याच्यामुळे ठाकरे यांचा तीळ पापड होतोय, प्रत्येक ठिकाणी जायचं आणि गद्दारीचा आरोप करायचा, एकनाथ शिंदे यांना गद्दारीचे शिरोमणी वगैरेची भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली. उलट उद्धव ठाकरे हेच गद्दारीचे मेरूमणी असल्याचा पलटवार केला. यावेळी उबाठाचे सहा खासदारांचे पक्षांतर नसून ती घरवापसी असल्याचा दावाही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा "घोडं, शिंगरू आणि दुतोंडी गांडूळ" असा उल्लेख केला. स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, आता सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरे करणे म्हणजे "वरातीमागून घोडे नाचवण्या सारखे" असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी माजी खासदार प्रा रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, जिप उपाध्यक्षा उषा गायकवाड, नगराध्यक्ष किरण गायकवाड, पंचायत समिती सभापती ॲड आकांक्षा चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनूरे, तालुका प्रमुख बळीराम सुरवसे आदी उपस्थित होते.
...अन्यथा पक्षाला कुलूप लागेल!
खासदार संजय राऊत यांच्याकडून सुरु असलेल्या वक्तव्यांचा वाघमारे यांनी समाचार घेतला. राऊत यांनी शिवराळ आणि खालच्या पातळीवरील वक्तव्यांमुळे ठाकरेच्या पक्षाची वैचारिक दिवाळखोरी सर्वांसमोर उघडी पडली आहे. त्यांच्या आक्षेपार्ह आणि घाणेरड्या भाषेला कंटाळून पक्षातील अनेक निष्ठावंत नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. उद्धव ठाकरे यांनी राऊताना आवर घालावा, अन्यथा पक्षालाच कुलूप लागण्याची वेळ येईल, असा इशाराही वाघमारे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या सल्ल्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता खडसे यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना, पुण्याच्या रेव्ह पार्टी प्रकरणातील खडसे यांच्या पतीचा उल्लेख करुन "एकनाथ खडसे यांचा जीव वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी वेळेवर मदत केली होती. अशा नेत्याबद्दल अशी वक्तव्ये करणे हे संस्कारांचे दर्शन घडवते," असेही त्या म्हणाल्या.