

तुळजापूर : तुळजापूरचे मंदिर गाभारा कोणत्याही परिस्थितीमध्ये पाडू दिला जाणार नाही, या षडयंत्राच्या विरोधात आपण राज्यभर रान उठवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तुळजापुरात दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ताफा भाजपच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी अडवल्याने महाद्वार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या. जोरदार घोषणाबाजी करत आव्हाड यांचे वाहन भाजप कार्यकर्त्यांनी रोखून धरले. तब्बल १५ ते २० मिनिटांचा प्रचंड गोंधळानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना बाजूला घेत आव्हाडांना रस्ता मोकळा करून दिला.
चार दिवसापूर्वी "होय मी हिंदू आहे" या मथळ्या खाली कुलस्वामीनी तुळजाभवानी मंदिर वाचवण्यासाठी तुळजापुरात येत असल्याचे ट्विट करत आ. आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर आ. आव्हाड यांनी मंगळवार (दि. १२) तुळजाभवानी मंदिरात भेट देऊन देवीचे दर्शन घेतले व मंदिर परिसरात पाहणी केली. यानंतर मंदिरातून बाहेर पडत असताना भाजप कार्यकर्त्यांनी महाद्वार समोर धरणे आंदोलन करत आ. आव्हाड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आव्हाड यांचा ताफा आडवला.