

विद्यार्थ्यांनाही लागली अभ्यासाची गोडी, ग्रामस्थांमधील संवादही वाढला
सायंकाळी 6 ते 8 दरम्यान टीव्ही, मोबाईल सुरू असल्यास 500 रुपये दंड
TV Mobile off Campaign
उमरगा (जि. धाराशिव) : उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी येथे गेल्या तीन वर्षांपासून गावात मुलांच्या अभ्यासासाठी दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्यात येतात. ग्रामपंचायतीचा भोंगा वाजला की, दररोज सायंकाळी सहा ते आठपर्यंत ही साधने बंद राहात असल्याने त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाही झाला आहे.
गेल्या काही वर्षांत संवादाचे माध्यम असलेल्या मोबाईल तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात आमूलाग्र बदल झाला आहे. सध्या घरोघर टीव्ही, मोबाईल, संगणक, लॅपटॉप आदी वस्तू दैनंदिन कामासाठी वापरतात. नवीन पिढी तर या सर्व साधनांची पुरस्कर्ती झाली आहे. सुरुवातीला कुतूहल म्हणून लहान मुलांच्या हातात दिलेला मोबाईल त्यांच्या सवयीचा भाग बनला आहे. गावोगावी टीव्हीवर मालिका, मोबाईलमुळे लहान मुलांच्या अभ्यासावर वेगवेगळे दुष्परिणाम होत आहेत. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन 2200 लोकसंख्या असलेल्या जकेकूरवाडीचे तरुण सरपंच अमर सूर्यवंशी यांनी यावर एक उपाय शोधला. त्यातून विद्यार्थी जगतालाही नवी दिशा मिळाली.
गावात जिल्हा परिषदेची पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. शाळेत दीडशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुलांना अभ्यास करता यावा म्हणून गावात टीव्ही आणि मोबाईल दररोज दोन तास बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीला ग्रामस्थांना त्यांनी या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगितले. मोबाईल, टीव्ही बंद राहावेत म्हणून भोंग्याच्या माध्यमातून आठवण करून दिली जाते. यामुळे गावातील विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या बैठकीसह गोडी लागली आहे. तसेच अभ्यासाचे वेळापत्रक तयार झाले असून, गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या निर्णयाचा गावातील इतर नागरिकांच्या एकमेकांशी संवाद वाढीला चांगला फायदा झाला आहे. विद्यार्थी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला असून याचे शंभर टक्के पालन होत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. गावात दररोज नियमितपणे टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीवर भोंगा लावण्यात आला आहे. भोंग्याचा आवाज कानावर पडताच घराघरातील टीव्ही, मोबाईल बंद होतो. सर्व मुले घरी जाऊन अभ्यासाला बसतात. या दरम्यान एकही मुलगा घराबाहेर पडत नाही. गावात रिीव शांतता राखली जाते. हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे.
भोंगा वाजल्यानंतर घरातील टीव्ही, मोबाईल बंदचे पालन व्हावे यासाठी ग्रामपंचायतीने पालक, गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांची स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. समिती सदस्याला सायंकाळी सहा ते आठदरम्यान एखाद्या घरी टीव्ही, मोबाईल सुरू असल्याचे निदर्शनास आले तर पाचशे रुपये दंड आकारण्यात येतो. तसेच या वेळेत एखादा विद्यार्थी अभ्यास न करता बाहेर आढळून आला तर त्याला सार्वजनिक अभ्यास करण्याच्या ठिकाणी जादा एक तास अभ्यासाला बसवले जाते.
अमर सूर्यवंशी (सरपंच, जकेकूरवाडी)
सरपंचांनी घेतलेल्या निर्णयामुळे मुलांत फरक पडला असून, ही संकल्पना अतिशय चांगली आहे. मुलांना अभ्यास करा म्हणून सांगायची गरज नाही. कारण मुले गेल्या तीन वर्षांपासून एकही दिवस न चुकता सायंकाळी सहा ते आठ या काळात अभ्यासासाठी बसत आहेत. याचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोठा फायदा झाला आहे.
शीतल चिट्टे (महिला पालक, जकेकूरवाडी)