

Inflation has reduced the size of Gulab Jamun
तुळजापूर, पुढारी पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी वर्षभर येथे भाविकांची रेलचेल असते. मात्र सध्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असलेल्या महागाईने आता उपहारगृहांनाही चांगलीच झळ बसू लागली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती झपाट्याने वाढल्यामुळे ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे अनुभव हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत. सुपारीच्या आकाराच्या गुलाब जामुनसाठी २० रुपये मोजावे लागत आहेत. असाच प्रकार बहुतांश नाश्ता प्रकारात झाला असून ग्राहक कमी झाल्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे.
तुळजापूर शहरात दक्षिण भारतासह अवघ्या महाराष्ट्रातून भाविकांची रीघ असते. या सर्वाना येथे आल्यानंतर पोटपूजेसाठी स्थानिक हॉटेलांचा आधार घ्यावा लागतो. मात्र वाढत्या महागाईने हळूहळू खाद्य पदार्थांचे दर वाढत असल्याचे चित्र आहे. शहरातील उपहारगृह चालक महागाईच्या झळा सोसत असून अनेक अडचणींना सामोरे जात आहेत.
खाद्य-तेल, साखर, गॅस, दूध, वेलची, सुका मेवा, मैदा, गहू, आणि इतर जिन्नस यांच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे उपहारगृह चालकांना दरवाढ करणे भाग पडले आहे. परिणामी प्रत्येक खाद्यपदार्थांच्या दरात किमान ७ रुपये तर काही पदार्थांमध्ये १० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
गुलाबजामून, बासुंदी, पेढे, फरसाण, समोसा, कचोरी, इडली, वडा, पोहे यासारख्या नाश्त्याच्या आणि गोड पदार्थांची येथे नेहमीच मागणी असते. विशेषतः बाहेरगावाहून येणारे भाविक या पदार्थांना पसंती देतात. मात्र आता प्रसिद्ध असणारा गुलाबजामून २० रुपयांना मिळत असून त्याचे आकारमान लहान झाले आहे. यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांवर याचा अधिक परिणाम झाल्याचे उपहारगृह चालकांचे म्हणणे आहे. दरवाढ होऊनही कच्च्या मालाचा खर्च निघणे अवघड बनले आहे. काही ठिकाणी ग्राहकांच्या अभावामुळे उपहारगृहांमध्ये मंदीचे वातावरण पसरले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपहारगृह चालकांसाठी काही शासकीय मदतीच्या योजना राबवाव्यात अशी मागणी देखील काही व्यापाऱ्यांनी केली आहे.
महागाई खूप वाढली असल्यामुळे व ग्राहकांना सांभाळण्यासाठी गुलाब जामुन आणि पेढा यांचा आकार छोटा केला आहे. खवा आणि तेलाचे भाव, हॉटेलसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू यांचे भाव जास्त वाढले आहेत. परिणामी व्यवसाय करताना तारेवरची कसरत होते आहे.
१५ वर्षांची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये जवळपास ५० टक्के दरवाढ झाली आहे असे तुळजापूर हॉटेल व्यावसायिक नागनाथ बाबूराव जगताप यांनी सांगितले.