

Shiradhon deputy sarpanch notice
कळंब : कळंब तालुक्यात सर्वात मोठी शिराढोण ग्रामपंचायतीच्या अपूर्ण कामाचा उपसरपंच अमित माकोडे यांनी पंचनामा केला. त्यांनी विविध कामाच्या संदर्भात कळंब गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. यावर दि. 17 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात उपस्थित रहाण्याचे सरपंच लक्ष्मी दिलीप म्हेत्रे यांना सांगितले होते.
या सुनावणीत पुढची तारीख 24 जुलैरोजी दिली होती . परंतु दि.16 जुलै रोजी गटविकास अधिकारी विनोद जाधव यांनी उपसरपंचासह सर्वच 16 सदस्यांना 15 व्या वित्त आयोगातील ग्रामपंचायत स्तरावरील खर्च 34.72 टक्केच खर्च करण्यात आलेला असल्याचे निदर्शनास आणून देत आपण ग्रामपंचायत सदस्य या नात्याने मासिक बैठकीत वेळोवेळी निधी खर्च करणे बाबत कार्यवाही करणे आवश्यक असताना आपण तशी कार्यवाही केलेली दिसून येत नाही, असे सांगितले.
ही बाब गंभीर असून या प्रकरणी तीन दिवसांत लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर तो असमाधानकारक असेल किंवा मुदतीत सादर केला नाही. तर आपले याबाबत काही म्हणायचे नाही, असे समजून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 39 (1) नुसार कार्यवाही प्रस्तावित करणार असल्याचे सांगितले.
याबाबत गटविकास अधिकारी विनोद जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे खुलासे आले आहेत. ते पाहून मी सोमवारी माहिती देतो, असे सांगितले .
आम्ही ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक यांना सहकार्य केले आहे. मासिक बैठकीत आम्ही मंजुरी दिली आहे. कामे पूर्ण करून घ्यायची जबाबदारी ग्रामसेवक व सरपंच यांची आहे. आम्ही याबाबत कागदपत्रे सादर करणार आहोत.
अमित माकोडे, उपसरपंच शिराढोण