

How will we get the seven TMC of water we are entitled to?
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : धाराशिव आणि बीड जिल्ह्यांच्या दुष्काळी भागाला हक्काचे सात टीएमसी पाणी मिळवून देणाऱ्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील तीन महत्त्वाचे टप्पे रखडल्याचे आ. कैलास पाटील यांच्या पाहणी दौऱ्यात समोर आले. नीरा-भीमा आणि जेऊर या दोन्ही बोगद्यांची कामे बंद असून, मिरगव्हाण पंपगृहाचे कामही संथ गतीने सुरू आहे. मग मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळणार कसे, असा सवाल आ. पाटील यांनी उपस्थित केला.
उद्धट बंधाऱ्यातून सात टीएमसी पाणी २३.६८ किलोमीटर लांबीच्या नीरा-भीमा बोगद्याद्वारे उजनी जलाशयात आणले जाणार आहे. मात्र, या बोगद्याचे २३.६८ पैकी २०.९९ किलोमीटर काम पूर्ण झाले असून, उर्वरित २.६९ किलोमीटरचे काम जून २०२३ पासून बंद आहे. उद्धट बंधारा आणि उजनी जलाशयाच्या बाजूला बोगद्याचे तसेच खुल्या पद्धतीने खोदकामाचे काम अपूर्ण आहे. आर्थिक नियोजनाअभावी काम रखडल्याचे सांगण्यात आले.
पुढे उजनीतून दहिगावमार्गे २६.८५ किलोमीटर लांबीच्या जेऊर बोगद्याद्वारे पाणी मिरगव्हाण पंपगृहापर्यंत नेले जाणार आहे. या बोगद्याचे २३.९७ किलोमीटर खोदकाम पूर्ण झाले असून, २.८८ किलोमीटर काम बाकी आहे. हे काम २७ जुलै २०२४ पासून बंद आहे. विशेष म्हणजे, दहिगाव येथे उजनीतून पाणी घेण्यासाठी आवश्यक प्रवेश संरचनाही अद्याप अपूर्ण आहे. मिरगव्हाण पंपगृहाचेही केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.
येथे प्रत्येकी १,९४० अश्वशक्तीचे सात पंप बसविण्यात येणार आहेत. या तीनही टप्प्यांतील कामे रखडल्याने पाणी सीना-कोळेगाव जलाशयापर्यंत पोहोचण्यास विलंब होत आहे. या प्रकल्पातून ३.०८ टीएमसी पाणी सीना-कोळेगाव जलाशयात, तर २.२४ टीएमसी पाणी बंद नलिका गुरुत्व वाहिनीद्वारे सीना नदीत सोडण्याचे नियोजन आहे.
बंद बोगद्यांची कामे तातडीने सुरू करावीत, पंपगृहाच्या कामाला गती द्यावी आणि मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते.