

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शुक्रवारी (दि.१३) दुपारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल ७ एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत तीन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अणदूरमधील संजय नगर येथील शिवारातील शिवराज कुताडे, लक्ष्मण हागलगुंडे आणि श्याम कुताडे यांच्या शेतातील उसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. शेजारील शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीचा वेग इतका प्रचंड होता की, डोळ्यादेखत सात एकरांतील ऊस जळून राख झाला.
आधीच दुष्काळाने शेतीचे आर्थिक गणित कोलमडलेले असताना नगदी पीक असलेला ऊस आगीत भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ आली आहे. वर्षभर केलेले कष्ट, खर्च आणि उत्पन्नाच्या अपेक्षा क्षणात राख झाल्याने तिन्ही शेतकरी हतबल झाले आहेत. या घटनेने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
शासनाकडून मदतीची अपेक्षा
या दुर्घटनेची शासनाने तातडीने दखल घेऊन महसूल आणि कृषी विभागामार्फत पंचनामे करणे अपेक्षित असताना पंचनामा करण्यासाठी दुसरा दिवस लागला. जळालेला ऊस अद्यापही शेतामध्ये आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
घटनास्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक आलूरे, राहुल मुळे,कृषी सहाय्यक अधिकारी पी. आर. जाधव, पोलीस पाटील जावेद शेख आणि अरविंद गायकवाड यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.