

Guardian Minister Sarnaik extends an 'open' invitation to MPs and MLAs
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा :
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शनिवारी विकासाच्या मुद्द्यांवरून चर्चा सुरू असतानाच अचानक राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी थेट बैठकीतच शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना आपल्या पक्षात अर्थात महायुतीत सहभागी होण्याचे खुले निमंत्रण दिले. मात्र, या दोन्ही नेत्यांनी "जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे, असे सांगत पालकमंत्र्यांचे निमंत्रण अतिशय नम्रपणे पण ठाम शब्दांत नाकारले.
बैठकीदरम्यान बोलताना पालकमंत्री सरनाईक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संदर्भ दिला. लोकसभा आणि विधानसभेला अजून तीन-साडेतीन वर्षे अवकाश असला तरी, त्याआधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आताच विचार करून निर्णय घ्या, असे सूचक वक्तव्य सरनाईक यांनी केले.
जनतेचा आदेश शिरसावंद्य
पालकमंत्र्यांच्या या ऑफरवर आमदार कैलास पाटील यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, जनतेने दिलेल्या आदेशानुसार आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहोत. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीतही जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे.
विकासकामांना स्थगिती नको
मतदान कोणाला केले हे कधीच कळत नाही, पण लोकांच्या मागणीनुसार आम्ही कामे मांडतो. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी विकासकामे थांबवू नयेत. मंजूर कामांना स्थगिती देणे किंवा अडथळे आणणे योग्य नाही, अशी आग्रही भूमिका खासदार निंबाळकर यांनी मांडली.
डीपीसीमध्ये रंगला राजकीय सामना
एकीकडे जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा ठरत असताना पालकमंत्र्यांनी टाकलेला राजकीय गुगली आणि त्यावर खासदार-आमदारांनी मारलेला डिफेन्स हा बैठकीतील चर्चेचा विषय ठरला. पालकमंत्र्यांनी पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले, तर ओमराजेंनी आम्ही जिथे आहोत तिथेच खुश आहोत असे सांगत भाजप-शिवसेनेला शुभेच्छा दिल्या.