

Flooding in all rivers in Dharashiv district, disrupting normal life; internal transport disrupted
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर शुक्रवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. सलग सरींमुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. परंडा व भूम तालुक्यात नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सीना, मांजरा, खैरी, तेरणा अशा जिल्ह्यातील बहुतांश सर्वच नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूक कोलमडली आहे.
गेल्या आठवड्यात परंडा आणि भूम तालुक्यातील सीना नदीला पूर आल्याने मोठे नुकसान झाले होते. यात दोन जणांचा पुरात बळी गेला होता, तर ४०० ते ५०० पशुधन वाहून गेले होते. दोन दिवसांपूर्वी पावसाचा जोर ओ-सरल्यानंतर बचाव आणि मदत कार्य वेगात सुरू होते. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या पथकांनी बचाव मोहीम राबवली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते जिल्ह्यात येऊन नुकसानीचा आढावा घेऊन मदतीची ग्वाही देऊन गेले होते.
मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. वाशी तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली असून सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांची पत्रेही उडून गेली आहेत. मुरूम-अक्कलकोट, भूम जामखेड रस्ता पूरपाण्यामुळे बंद झाला असून बेंबळी-बोरखेडा मार्ग आणि तेर-पळसप रस्ता वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे.
पर्यायी पूल वाहून गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्यान, तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे रुई-ढोकी येथील पुलावर पाणी आले असून धाराशिव-लातूर मार्गावरील वाहतूक ढोकीमार्गे वळवण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. रात्री सात वाजल्यापासून सतत पाऊस चालू आहे रत्नापूर दहिफळ येरमाळा उपळाई संजीतपूरचा संपर्क तुटला आहे.