Dharashiv News : येडशीमध्ये घराला आग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

पणत्यांमुळे दुकानाला लागलेली आग घरात, धूर पसरल्याने झोपलेल्यांचा गुदमरून अंत
Dharashiv News
Dharashiv News : येडशीमध्ये घराला आग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यूfile photo
Published on: 
Updated on: 

Fire at a house in Yedshi; six members of the same family die

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा दिवाळीचा सण... घराघरांत आनंदाचे वातावरण... लक्ष्मीपूजनानिमित्त सजलेली दुकाने... आणि कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी बाहेरगावाहून गावी आलेल्या दोन मुली... मात्र, येडशीतील करंडे कुटुंबासाठी ही दिवाळी काळरात्र ठरली. किराणा आणि सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आग घरात पोहचली आणि एकाच कुटुंबातील सहा जणांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला.

Dharashiv News
Tuljabhavani Temple | तुळजाभवानी मंदिर परिसरात आगीचा भडका; भाविकांची धावपळ, मंदिरात गोंधळाचे वातावरण

थाराशिव शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या येडशी गावची रविवारची पहाट काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने उजाडली, येडशीतून लातूरकडे जाणाऱ्या चौकात करंडे कुटुंबाची किराणा आणि सौंदर्य प्रसाधनांची दोन दुकाने आहेत. रविवारी सायंकाळी लक्ष्मीपूजनानिमित्त दुकानांची पूजा आटोपल्यानंतर दुकाने बंद करण्यात आली.

त्यानंतर पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास दुकानांना आगीच्या ज्वाळांनी वेढल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. उत्तम त्रिंबक करंडे (७५), चंद्रकला उत्तम करंडे (७०), गोविंद उत्तम करंडे (४७), ज्योती गोविंद करंडे (४२), गायत्री गोविंद करंडे (१७) आणि सिद्धी गोविंद करंडे (१४) यांचा या दुर्घटनेत अंत झाला. दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी गावी आलेल्या दोन्ही मुलींनाही काळाने हिरावून नेले. या घटनेने येडशी गावावर शोककळा पसरली असून, करंडे कुटुंबाचे हसते खेळते घर क्षणात उद्ध्वस्त झाले.

Dharashiv News
Tuljapur Crime | मोबाईलसाठी पैसे न दिल्याने मुलाकडून वडिलांचा खून

दुकानांच्या वरच्या मजल्यावर करंडे कुटुंब वास्तव्यास होते. कुटुंबातील सहाही सदस्य गाढ झोपेत होते. दुकान आणि घरातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असल्याने आगीच्या ज्वाळांनी त्याच मार्गाला वेढा घातला होता. दोन्हीं दुकानांतील साहित्याने आगीने वेगाने पेट घेतला आणि धुराचे लोट वरच्या मजल्यावरील घरात शिरू लागले. झोपेत असलेल्या कुटुंबीयांना धुराचा त्रास सुरू झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी आक्रोश केला; मात्र धुरामुळे त्यांचा आवाज बाहेरपर्यंत पोहोचू शकला नाही. बाहेर पडण्याचा मार्ग आगीने अडवल्याने त्यांना जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. अनेकांनी आपापल्या बोअरवेल सुरू करून पाण्याचा मारा केला. धाराशिव, कळंब आणि तुळजापूर येथून अग्रिशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनी जेसीबीच्या साह्याने घराची भिंत फोडून धुराचे लोट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येईपर्यंत आणि बचावकार्य सुरू होईपर्यंत खूप उशीर झाला होता. सहाही जणांचा मृत्यू झाला होता. दिवाळीच्या पणत्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पहाटेच गावात धाव घेत बचावकार्यात सहभाग घेतला. त्यानंतर आमदार कैलास पाटील, आमदार प्रतापसिंह पाटील तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. याबाबत धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. वरिष्ठ पोलिस अधिकारीही येथे ठाण मांडून होते. दुर्घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी दिली.

अग्रिशमन व्यवस्थेवर गावकऱ्यांचा संताप

या दुर्घटनेच्या निमित्ताने धाराशिव नगरपालिकेच्या अग्रिशमन दलाकडील वाहनांच्या सज्जतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धाराशिवमधील अग्रिशमन वाहनांच्या क्षमतेबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अग्रिशमन यंत्रणा अधिक सक्षम आणि तत्पर असती, तर कदाचित काही जीव वाचवता आले असते, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ट्रॅव्हल्स चालकामुळे दुर्घटनेची माहिती मिळाली

पहाटे अडीचच्या सुमारास पुण्याहून लातूरकडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्स चालकाच्या निदर्शनास रस्त्यालगतचे घर आणि दुकाने पेटल्याचे आले. त्याने वाहन पुढे नेत लातूर रस्त्यावरील रात्रभर सुरू असलेल्या एका हॉटेलमध्ये याची माहिती दिली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी मालकाला सांगितल्यानंतर त्यांनी गावातील नागरिकांना दूरध्वनीद्वारे कळवले. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. एका प्रवाशाच्या सतर्कतेमुळे गावकऱ्यांना दुर्घटनेची माहिती मिळाली; मात्र तोपर्यंत आगीने मोठे नुकसान केले होते.

दिवाळीसाठी गावी आल्या अन् काळाने गाठले

करंडे कुटुंबातील गायत्री आणि सिद्धी या दोन्ही मुली शिक्षणासाठी बाहेरगावी होत्या. दिवाळीचा सण आई-वडील आणि कुटुंबीयांसोबत साजरा करता यावा, या ओढीने त्या गावी आल्या होत्या. सणाच्या आनंदात कुटुंबासोबत घालवलेले ते काही क्षण अखेरचे ठरले. अवघ्या १७ आणि १४ वर्षांच्या या मुलींचा अशा प्रकारे अंत झाल्याने गावकऱ्यांचे डोळे पाणावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.