Tuljabhavani Temple | तुळजाभवानी मंदिर परिसरात आगीचा भडका; भाविकांची धावपळ, मंदिरात गोंधळाचे वातावरण

पाडव्याच्या दिवशी बिडकर तलाव परिसरात अचानक आग; वाळलेली झाडे आणि कचरा जळून खाक, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात
Tuljabhavani Temple
Tuljabhavani Temple Pudhari
Published on: 
Updated on: 

Tuljapur Fire Incident

तुळजापूर : दिवाळी पाडव्याच्या सणानिमित्त आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळलेली असतानाच मंदिर परिसरात मंगळवारी (दि. १०) दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. बिडकर तलाव परिसरात लागलेल्या या आगीमुळे काही काळ एकच खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसताच दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये घबराट पसरली. अनेक भाविकांनी सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धावपळ केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दीपावली उत्सवातील पाडवा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे दाखल होतात. त्यामुळे मंदिर परिसरात दिवसभर भाविकांची मोठी वर्दळ असते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बिडकर तलाव मार्गे मंदिराकडे सोडण्यात येते. अशा गर्दीच्या वेळीच दुपारच्या सुमारास बिडकर तलाव परिसरात अचानक आगीचा भडका उडाला.

Tuljabhavani Temple
Dharashiv Fire : साकत-अंतरगाव परिसरात भीषण आग; २०० एकरांवरील ऊस जळून खाक!

परिसरात आग लागल्याचे निदर्शनास येताच भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीच्या ठिकाणापासून दूर जाण्यासाठी अनेकांनी धावपळ सुरू केली. काही काळ मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या आगीत परिसरात भाविकांनी टाकलेला कचरा तसेच डोंगरावरील मोठ्या प्रमाणातील वाळलेली झाडे आणि झुडपे जळून खाक झाली. आगीने परिसरातील सुक्या वनस्पतींना वेढल्याने काही काळ आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. जवानांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे.

Tuljabhavani Temple
Dharashiv Fire News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गरीब कुटुंबाचा संसार आगीत भस्मसात; तरुणांच्या धाडसाने शेकडो घरांना वाचवले!

दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंदिर परिसरात सणासुदीच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने अशा घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी परिसरातील कचऱ्याची नियमित विल्हेवाट आणि वाळलेल्या झाडाझुडपांची स्वच्छता करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.