

Financial assistance to 1,300 entrepreneurs by the end of December
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : मागील तीन वर्षापासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत आपला जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. ठरवून दिलेले उद्दिष्ट मागील तीन वर्षांपासून आपण सातत्याने पूर्ण केले आहे. शेकडो तरुणांना यातून हक्काचे उद्योग उभारता आले आहेत.
चालू वर्षात डिसेंबर अखेर आणखी १३०० नव्या उद्योजकांना आर्थिक सहकार्य करण्याचे उद्दीष्ट ठरवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी यंदाही आपला जिल्हा राज्यात अव्वल क्रमांकावर कायम ठेवण्यासाठी निर्धारित करण्यात आलेले उद्दिष्ट डिसेंबर पर्यत पूर्ण करावे, असे आवाहन मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
मंगळवारी आ. पाटील यांच्या उपस्थितीत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच विविध आर्थिक विकास महामंडळांच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजना व प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या कर्ज वितरणाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्राचे महासंचालक, तसेच सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, सर्व महामंडळांचे अधिकारी उपस्थित होते. सध्या जिल्हा उद्योग केंद्रातून एकत्रित २५० प्रकरणे मंजूर केली जातात.
मात्र, त्यामुळे सुरुवातीला मंजुरीसाठी प्रकरण दाखल केलेल्या अर्जदारांना मंजुरी मिळण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे आता २५ प्रकरणे दाखल होताच त्वरीत मंजुरी देण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्व महामंडळांनी आपापल्या योजनांतर्गत कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बँकेची रिकव्हरीची अडचण समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याबाबत देखील यावेळी चर्चा झाली.
यावेळी सर्व महामंडळांकडून कुठल्या योजनेअंतर्गत किती जणांना मदत करण्यात आली याची सविस्तर माहिती मागवण्यात आली होती. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना इन्शुरन्सच्या माध्यमातून मदत करण्यासंबंधी राबवल्या जात असलेल्या प्रभावी उपाययोजनांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. चालू वर्षासाठी जिल्ह्याला अर्थात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती (सीएमईजीपी) कार्यक्रमांतर्गत १,३०० नवीन उद्योजक उभे करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.