

Experts will check the details for the Shiv Bhavani sculpture: MLA Patil
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात १०८ फूट उंच शिवभवानी शिल्प हे एक नवे आकर्षण ठरणार आहे. हे शिल्प धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक अंगाने परिपूर्ण असावे यासाठी राज्याच्या कला संचालनालयाकडे सादर झालेल्या १४ प्रतिकृतींपैकी पाच प्रतिकृती निवडण्यात आल्या असून, त्या तज्ज्ञ समितीकडून पुन्हा तपासल्या जाणार आहेत.
आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले की, तज्ञ समितीने सूचविलेल्या दुरुस्तीनुसार निवडलेल्या पाचही शिल्पकारांना नव्याने सुधारित प्रतिकृती सादर करण्यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात येईल. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या शिल्पांपैकी एक प्रतिकृती अंतिम केली जाईल.
हे भव्य शिल्प ब्राँझ धातूचे असून, त्यात तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देताना दाखविण्यात येणार आहे. नोंदणीकृत व अनोंदणीकृत शिल्पकारांनी तयार केलेल्या मॉडेल्सपैकी या पाच सर्वोत्तम प्रतिकृती निवडल्या गेल्या आहेत. संग्रहालय आणि माहिती केंद्र, २० एकरांवर आकर्षक बगीचा आणि प्रकाशयोजना उभारण्यात येणार आहे.