

Effects of intense heat on Dhule-Solapur highway; The roads are deserted in the afternoon.
बाळासाहेब जाधवर
रत्नापूर : पुढारी वृत्तसेवा धुळे–सोलापूर महामार्गावर सध्या ४१ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचलेले आहे. अशा कडाक्याच्या उन्हाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारी बारा ते चार या वेळेत रस्त्यावरची वाहतूक लक्षणीयरीत्या कमी होत असून, तुरळक वाहनेच धावताना दिसत आहेत. वाढत्या तापमानामुळे वाहनचालकांना प्रवास करणे कठीण होत आहे.
कडक उन्हामुळे वाहनांचे इंजिन लवकर गरम होत असल्याने अनेक चालक सावलीचा आधार घेत आहेत. विशेषतः अवजड वाहने चालवणारे चालक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली गाड्या उभ्या करून काही वेळ विश्रांती घेताना दिसत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेत महामार्गावर काही ठिकाणी वाहनांची रांग झाडांच्या सावलीत उभी राहिलेली पाहायला मिळते.
तापमान ४१–४२ अंशांपर्यंत गेल्याने टायर फुटणे, इंजिनला आग लागणे यांसारख्या घटनाही अधूनमधून घडत आहेत. या धोक्यामुळे चालक अधिक सावधगिरी बाळगत असून, गरज पडल्यास प्रवास थांबवून विश्रांती घेण्याचा पर्याय निवडत आहेत.
दुपारनंतर सुमारे चार वाजल्यानंतर वातावरणातील उष्णता काहीशी कमी होताच पुन्हा वाहतूक सुरळीत आणि गजबजलेली दिसू लागते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. वाहनाची नियमित तपासणी, टायर प्रेशर योग्य ठेवणे, पुरेसे पाणी बाळगणे आणि अत्यंत उष्णतेच्या वेळेत प्रवास टाळणे, असे आवाहन करण्यात येत आहे.