

सोलापूर : सोलापूर हे तापमानाचे हॉटस्पॉट ठरले असून, सलग तिसऱ्यादिवशी तापमानात उच्चांकी नोंद झाली. सोमवारी 42.5 अंश सेल्सिअस पारा नोंदला गेला. सकाळी सात-आठपासूनच उन्हाचे चटके जाणवायला सुरूवात झाली, दुपारपर्यंत या हंगमातील सर्वोच्च तापमान सोमवारी नोंदले गेले.
वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः घामाघूम झाले. किमान तापमानातही वाढ झाली असून, 28 अंश सेल्सिअस इतका पारा नोंदला गेला. हवेतील आर्द्रता 28 टक्के असल्याने उष्णतेच्या झळा वाहत असल्याने अंगाला उन्हाचे चटके बसत आहेत.
दुपारी 12 ते 4 या दरम्यान पारा 42 अंशांच्या वर गेल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट आहे. उष्म्यापासून बचावासाठी शहाळी, ताक आणि शीतपेयांच्या गाड्यांवर गर्दी वाढली आहे.
उष्माघाताचे रुग्ण आढळल्यास तातडीने उपचार मिळावेत यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये हिट स्ट्रोक कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. उष्माघाताची लक्षणे दिसताच त्वरित नजीकच्या दवाखान्यात संपर्क साधावा असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.