

Dharashiv's public representatives support Maratha reservation movement
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: मराठा आर क्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठिंबवा दर्शविला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या भेटीत या नेत्यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सरकारला ही मागणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले.
भाजप आमदारांकडून आंदोलकांना मदत दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही आंदोलकांना मदत केली आहे. तेरणा परिवाराच्या येथील शैक्षणिक संस्थेत त्यांनी जिल्ह्यातून गेलेल्या आंदोलकांसाठी निवास, वाहन पार्किंग आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. दिवसभर सोशल मीडियावर या सोयी सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्यातील आंदोलकांना केले जात होते.
जिल्ह्यातील हजारो नेरुळारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून, ते आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे मुंबईतील मराठा समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडले असून, आरक्षणाच्या मागणीला बळ मिळाले आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या मागणीला पाठिंबा दिल्याने समाजातून समाधान व्यक्त होत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून जिल्ह्यात मराठा आंदोलन वातावरण पेटलेले आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष तसेच लोकप्रतिनिधी या आंदोलनात सहभागी आहेत. लोकसभा निवडणुकीत या आंदोलनाचा मोठा प्रभाव होता. त्यावेळी या आंदोलनाचा अनेकांना फटका आणि काहींना फायदा झाला होता.
दरम्यान, जिल्ह्यातून जे कार्यकर्ते, नागरिक आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले आहेत, त्यांनी मुंबईतील फोटो टाकून तेथील झलक दाखवली, तर ज्यांना मुंबईतील आंदोलनात सहभागी होता आले नाही, असे कार्यकर्ते या आंदोलनाची धग सोशल मीडियातून कायम ठेवत आहेत.
नवी मुंबई येथील नेरुळच्या तेरणा विद्यालय आणि जुनिअर कॉलेज परिसरात धाराशिवसह संबंध मराठवाड्यातून आलेल्या आपल्या बांधवांची तेरणा परिवाराच्या माध्यमातून सर्वतोपरी सोय करण्यात आली आहे, असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.