

उमरगा : शहरातील मोमीन मस्जिद जवळील राहत्या घरात एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. ही घटना शनिवारी (१२ जुलैला) घडली होती. या महिलेचा खून चारित्र्याच्या संशयातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माया रमेश शिंदे (वय ४५) असे या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा प्रियकर माधव पांडुरंग पाचंगे (वय ४४, रा हिप्परगाराव, हल्ली मुक्काम तुरोरी ता. उमरगा) याला अटक करण्यात आली.
शहरातील पतंगे रोड परिसरातील मोमीन मस्जिद जवळील राहत्या घरी माया शिंदे ही महिला मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्या गळयावर व्रण आढळून आल्याने पोलिसांनी खूनाचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सीसीटिव्ही फुटेजच्या चौकशीच्या आधारे तिच्या माधव पाचंगे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने माया हिच्याशी आपले अनैतिक संबंध असून चारित्र्याच्या संशयातून तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी रोहिणी दिपक पाटोळे (रा. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी (दि.१४) उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी माधव पाचंगे हा गुन्हेगारी प्रवृत्ती असून त्याच्या वरती यापूर्वीही माया शिंदे हिला मारहाण आणि धमकी दिल्याचे गुन्हे दाखल आहेत. संशयिताला मंगळवारी उमरगा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि पांडुरंग कन्हेरे, पोउपनि गजानन पुजरवाड, पोहेकाॅ अतुल जाधव, अनुरूद्र कावळे, चैतन्य कोनगुलवार, वाल्मिक कोळी, शिवलिंग घोळसगांव यांच्या पथकाने केली.