

Umarga Theft Case
उमरगा: तालुक्यातील दुधनाळ येथे श्री शिवमहापुराण सोहळ्याच्या सांगतेनंतर झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चार महिलांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, (दि ०२) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव-लातूर सीमेवरील उमरगा तालुक्यातील दुधनाळ येथे श्री महादेव मंदिर वर्धापनदिन व अधिक मासा निमित्त आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांच्या श्री शिव महापुराण कथेचे राजेंद्र पाटील कुटुंबाच्या वतीने २७ मे ते ०२ जून पर्यंत आयोजन करण्यात आले होते.
या दरम्यान दररोज लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लाखों भाविकांनी हजेरी लावली होती. यात महिला भाविकांची संख्या सर्वाधिक होती. कथा सोहळ्याचा मंगळवार शेवटचा दिवस असल्याने पहाटे पाच पासून महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, चंदीगड आदी परराज्यातील लाखों भाविकांची मैदानाकडे रीघ लागली होती.
श्री शिवमहापुराण सोहळा संपल्यानंतर दुधनाळ बसस्थानकावर घरी परतणाऱ्या भाविक आणि प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. बसमध्ये चढताना आणि उतरताना निर्माण झालेल्या गोंधळाचा व गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी महिला भाविकांना लक्ष्य केले. यात शांताबाई सोमवंशी (वय ८० रा. नारंगवाडी, ता. उमरगा), कविता गुळगे (रा. दुधनाळ), सुनंदा सोनटक्के (रा. बेंबळी) आणि उज्वला गावडे (रा. पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी व मंगळसूत्रे शिताफीने ओरबाडून तोडण्यात आली.
या चारही महिलांच्या मिळून सुमारे २९ ग्रॅम वजनाचे अंदाजे १ लाख ४५ हजार रुपये किंमतीची सोन्याचे दागिने लंपास केले. गर्दीतून बाहेर पडल्यानंतर गळ्यातील दागिने चोरीला गेल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी ज्येष्ठ महिला शांताबाई सोमवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
शिवमहापुराण कथा सोहळ्यांत पहिल्या दिवशी गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला भाविकांच्या गळ्यातील दागिने लांबवण्याच्या प्रयत्न करणार्या इंदोर मध्य प्रदेशातील तीन तसेच हैदराबाद येथील दोन अशा पाच महिलांना पोलीसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर शेवटच्या दिवशी घडलेल्या चोरीच्या घटनेतही परराज्यातील चोरट्या महिलांची टोळी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान श्री शिवमहापुराण सोहळा चोरांसाठी मोठी पर्वणी ठरला असल्याचे बोलले जात आहे.