

CM Relief Fund Maharashtra
तुळजापूर : राज्यासह धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळावा आणि संकटाच्या काळात त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तीन कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले आहे. मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी ३ कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक माया माने आणि सहकारी राहुल पाटील सास्तुरकर उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. अशा संकटाच्या काळात समाजातील विविध घटकांना मदतीचा आधार मिळावा, या भावनेतून तुळजाभवानी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
तुळजाभवानी मंदिर समितीच्या माध्यमातून यापूर्वीही विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग नोंदविण्यात आला आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीतही मंदिर समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले होते. यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तीन कोटी रुपयांचे योगदान देत समितीने सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम ठेवली आहे. आई तुळजाभवानी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
भाविकांच्या श्रद्धेतून प्राप्त होणाऱ्या निधीचा समाजहितासाठीही उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून मंदिर समितीने घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे या योगदानातून अधोरेखित झाले आहे. आई तुळजाभवानी मातेच्या कृपाशीर्वादाने राज्यासह धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना या कठीण परिस्थितीवर मात करण्याचे बळ मिळो आणि लवकरच दुष्काळाचे सावट दूर होऊन सर्वत्र सुख-समृद्धी नांदो, अशी प्रार्थनाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.