

Massive fire breaks out in Bhum, Paranda Shivara; Sugarcane worth 2 crores burnt to ashes!
भूम, पुढारी वृत्तसेवा वर्षभर कष्टाने जगवलेला ऊस कारखान्याला पाठवण्याच्या तयारीत असतानाच आगीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख केली. भूम तालुक्यातील अंतरगाव आणि परंडा तालुक्यातील साकत शिवारात २ नोव्हेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत २६ शेतकऱ्यांचे २७ हेक्टर ७ आर क्षेत्रातील ऊस व केळीची पिके जळून खाक झाली. याशिवाय ठिबक, तुषार सिंचन संच, पाईपलाइन, पाण्याच्या मोटारी आणि विद्युत साहित्याचेही मोठे नुकसान झाले. महसूल प्रशासनाच्या पंचनाम्यानुसार या आगीत एकूण २ कोटी ६१ लाख ८४ हजार २०० रुपयांचे प्राथमिक नुकसान झाले आहे.
पाणीटंचाई आणि अनियमित पावसाशी झुंज देत शेतकऱ्यांनी पिके जगवली होती. मात्र, कापणीच्या टप्प्यावर आलेला ऊस आगीत जळाल्याने वर्षभराची मेहनत वाया गेली. शेतीतील उभी पिके आणि सिंचन व्यवस्था नष्ट झाल्याने पुढील हंगाम कसा उभा करायचा; कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
घटनेनंतर महसूल प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले असून अहवाल शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार, याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. जळालेल्या पिकांसह सिंचन साहित्याची भरपाई देऊन शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी संतोष गणपत गोरे यांनी केली आहे.
नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असून, मदत लवकर मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला आहे, असे कृषी विभागाचे अतिरिक्त अधिकारी देविदास चौधरी यांनी सांगितले. तर पंचनामे पूर्ण झाले असून अहवाल वरिष्ठ पातळीवर शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार जयवंत पाटील यांनी दिली.