Dharashiv Fire News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गरीब कुटुंबाचा संसार आगीत भस्मसात; तरुणांच्या धाडसाने शेकडो घरांना वाचवले!

Fire
FirePudhari
Published on: 
Updated on: 

उमरगा : शहरातील कुंभार गल्ली (कुंभार पट्टी) परिसरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच एका गरीब कुटुंबावर आगीचे संकट कोसळले. रविवारी (दि. ०८) सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास मंगलबाई चंद्रकांत गायकवाड यांच्या घराला अचानक भीषण आग लागून संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

आयुष्यभर कष्टाने उभा केलेला संसार क्षणात राख झाल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, दाटीवाटीच्या वस्तीत स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडसामुळे शेकडो घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून बचावली.

संपूर्ण शहरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह सुरू असतानाच सायंकाळी गायकवाड यांच्या बंद घरातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना नागरिकांच्या निदर्शनास आले. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कुंभार गल्लीतील घरे एकमेकांना लागून असल्याने आग पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.

प्रसंगाचे गांभीर्य ओळखून शंकर सोनकांबळे, सचिन सुतके, मारुती खराते, किरण बनसोडे, दिगंबर भालेराव, विलास खराते, धीरज कांबळे, अनिल व्हंताळकर, प्रदीप कांबळे, हनुमंत बनसोडे यांच्यासह अनेक तरुणांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी धाव घेतली. पाण्याचा मारा करीत आग शेजारच्या घरांपर्यंत पोहोचू नये, यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या धाडसामुळे आगीचा फैलाव रोखण्यात यश आले.

त्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून उर्वरित आग पूर्णपणे विझवली. नगरसेवक बाबा मस्के यांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. माजी आमदार ज्ञानराज चौगुले, बळीराम सुरवसे, अमर देशटवार यांनी रात्रीच भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले व तातडीची आर्थिक मदत दिली. सोमवारी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी घटनास्थळी भेट देत कुटुंबाला धीर दिला.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच एका गरीब कुटुंबाच्या घरातील लक्ष्मी आगीने हिरावून घेतल्याची हळहळ परिसरातून व्यक्त होत आहे. संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याने गायकवाड कुटुंब उघड्यावर आले आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.