

Solapur Dhule Highway Robbery
बाळासाहेब जाधवर
रत्नापूर : सोलापूर - धुळे महामार्गावरील उपळाई पाटी परिसरात (जि. धाराशिव) ट्रक चालकांची ‘टायगर गेम’च्या नावाखाली लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मागील सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा वाहन चालकांमध्ये होत असून या मार्गाने प्रवास करणाऱ्या ट्रक चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपळाई पाटीजवळ रस्त्याच्या कडेला एक आयशर टेम्पो आणि एक पिकअप वाहन उभे केले जाते. या वाहनाजवळ काही जण थांबून महामार्गावरून येणाऱ्या ट्रक वाहनांना हात करून थांबवतात. ट्रक चालक थांबल्यानंतर त्यांना पुढे आरटीओची तपासणी सुरू असल्याचे सांगितले जाते. “आम्हीही आरटीओच्या भीतीने थांबलो आहोत,” असे सांगून चालकांना काही वेळ तिथेच थांबवले जाते.
यानंतर चालकांना वेळ घालवण्यासाठी ‘टायगर गेम’ खेळण्याचा प्रस्ताव दिला जातो. सुरुवातीला एक-दोन गेम ट्रक चालकाला जिंकू दिले जातात, त्यामुळे चालकांचा विश्वास बसतो. त्यानंतर चालकांकडून अधिक पैसे लावून खेळ सुरू केला जातो. मात्र, पुढील खेळांमध्ये चालक एकही गेम जिंकू शकत नाही. अशा प्रकारे हळूहळू खेळाच्या नावाखाली चालकांकडील रोख रक्कम घेतली जाते. काही प्रकरणांमध्ये दबाव टाकून किंवा धाक दाखवून चालकाच्या जवळ असलेले सर्व पैसे काढून घेतल्याची चर्चा वाहनचालकांमध्ये होत आहे.
वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार, उपळाई पाटी परिसरात हा प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे अनेक ट्रक चालक या भागातून जाताना सावध राहत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, या प्रकाराबाबत येरमाळा पोलिसांना माहिती आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांमध्ये या प्रकरणात पोलिसांचे दुर्लक्ष किंवा लागेबांधे असल्याचीही चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे.
एका ट्रकचालकाने याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन इतर ट्रकचालकांना सावध केले आहे. त्यानंतर हा विषय चर्चेत आला आहे. महामार्गावर चालकांची अशा प्रकारे फसवणूक करून लूट करणाऱ्या टोळीवर पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या संदर्भात येरमाळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता याबाबतची माहिती घेणार असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.