

रत्नापूर : कळंब तालुक्यातील रत्नापूर येथील अंगणवाडीमध्ये बालकांना देण्यात आलेल्या खाऊच्या भातामध्ये आळी आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंगणवाडीतील लहान बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवरच या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालक व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बालकांना देण्यात येणाऱ्या भातामध्ये आळी आढळल्याने संबंधित आहार तयार करताना स्वच्छता व अन्नाच्या गुणवत्तेची योग्य काळजी घेतली जाते का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लहान मुलांच्या आरोग्यासाठी शासनाकडून पोषण आहार दिला जात असताना अशा प्रकारची घटना घडणे गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अंगणवाडीतील बालकांना सकस, स्वच्छ आणि दर्जेदार आहार मिळणे आवश्यक असताना आहारात आळ्या आढळल्याने पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. संबंधित घटनेची तातडीने चौकशी करून आहाराचा दर्जा तपासावा, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, अंगणवाडी व शालेय पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन रत्नापूर अंगणवाडीतील आहाराची तपासणी करावी आणि बालकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.