

Dharashiv Rain: Continuous downpour in Kalamb taluka, rivers and drains overflow, crops are ruined
कळंब, पुढारी वृत्तसेवाः हवामान खात्याने धाराशिव जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली कमी अधिक प्रमाणात हा रात्रभर बरसत होता. पावसाने दुपारी दोन वाजता विश्रांती घेतली. या अगोदरच झालेल्या पावसामुळे शेतातील सोयाबीन, ऊस, तुर, मुग, उडीद आदी पिकांचा चिखल झाला असून, जनावरांच्या चारयाची वानवा झाली आहे.
सध्या माणसाला अन्न नाही, जनावरांना चारा नाही आणि झोपायला जागा नाही अशी अवस्था तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंबियांची झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असुन आता शासनाच्या मदतीकडे लक्ष असुन शासन या शेतकर्यांना मदत करणार की वारयावर सोडून देणार येणाऱ्या काळातच कळेल.
तालुक्यातील इटकूर येथील वाशीरा, शिराढोण येथील ढोरी जवळा येथील जवळा नद्यांना पाणी आल्याने छोटे पुल वाहून गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा, शेतीचा आणि जनावरांचा संपर्क तुटला होता. मांजरा धरणाच्या खाली असलेल्या आवाड शिरप रा, सौदणा अंबा, वाकडी, लासरा आदी गावातील नदी लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून ऊस, सोयाबीन पिके उध्वस्त झाली आहेत.
तसेच शेतातील सोलार मोडले असुन जमीनीवरील माती खरडून गेली आहे. नगरपालिकेच्या तळमजलयातील दुकानात पाणी घुसून व्यापार्याचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच पाऊस असल्याने कळंब शहरासह शिराढोण, ईटकूर, खामसवाडी येथील बाजारपेठा बंद होत्या त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता.
हेक्टरी पन्नास हजार रुपये व जनावरांच्या चाऱ्यासाठी वेगळा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा. अगोदरच आकाड व श्रावण महिन्यात शेतकरी संकटात असतो. त्यात तोंडाला आलेले सोयाबीन व ईतर पिके उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे हा निधी तर द्यावाच सोबत रब्बीसाठी एकरी रब्बी पिकांचे बियाणे व खत शासनाने गावावात उपलब्ध करून द्यावे असे माजी उपसभापती गुणवंत पवार यांनी सांगितले.