धाराशिव: येनेगुर येथे शाळेला जाणाऱ्या दोन मुलींना कंटेनरने उडवले: एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर
उमरगा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील येनेगुर येथील दोन मुलींना भरधाव कंटेनरने जोराची धडक दिली. या अपघातात मुलगी ठार झाली. तर आणखी एक मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना आज (दि. १४) सकाळी घडली. दरम्यान महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करून संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखून धरला. जिल्हाधिकारी आल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला.
येनेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात सातवी वर्गात शिकणारी कु. श्रेया सुरेश पात्रे (वय १३) ही मुलगी मृत झाली. तर सहावी वर्गात शिकणारी श्रद्धा श्रीकांत कांबळे (वय १२ ) ही गंभीर जखमी झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी या दोन मुली शाळेला जात होत्या. यावेळी अज्ञात भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे येणेगूर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रफिक तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य संतोष कलशेट्टी, विलास व्हटकर आदीसह विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी आक्रमक भूमिका घेतली. या अपघाताचे वृत्त समजताच तहसीलदार गोविंद येरमे यांनी घटनास्थळी भेट घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. मात्र जनतेच्या भावना तीव्र होत्या.
हेही वाचा