

Kalamb Dharashiv Mane Couple Mahapuja
रत्नापूर : आषाढी एकादशीच्या पवित्र आणि मंगलमय पर्वावर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्याला लाभला. जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील ज्येष्ठ वारकरी बाबासाहेब माने व प्रभावती माने या वारकरी दांपत्याला हा मान मिळाल्याने संपूर्ण धाराशिव जिल्हा, कळंब तालुका आणि गौरगाव गावासाठी हा अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा क्षण ठरला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या समवेत माने दांपत्याने श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी राज्याच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि सर्वांच्या मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली.
महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माने दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) त्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवासाचा पास प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या अनेक वर्षांच्या अखंड वारी परंपरेचा, पांडुरंगावरील अढळ श्रद्धेचा आणि वारकरी संस्कृतीच्या जपणुकीचा गौरव मानला जात आहे.
ही बातमी समोर आल्यानंतर गौरगावसह संपूर्ण कळंब तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून माने दांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. "आमच्या गावातील वारकऱ्यांना विठुरायाच्या महापूजेचा मान मिळणे, हे संपूर्ण गावाचे भाग्य आहे," अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
अखंड हरिनाम, निस्सीम भक्ती आणि वारकरी परंपरेची आयुष्यभर सेवा करणाऱ्या माने दांपत्याला लाभलेला हा सन्मान म्हणजे प्रत्येक वारकऱ्यासाठी प्रेरणादायी असून, धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण म्हणून कायम स्मरणात राहील.