Ashadhi Ekadashi: भाविक वाढले, दर्शन रांग लांबली

यंदा प्रथमच दर्शनरांगेत २० पत्राशेडची निर्मिती, भाविकांचा प्रवास झाला अधिक सुखकर
Ashadhi Ekadashi: भाविक वाढले, दर्शन रांग लांबली
Published on
Updated on

पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यंदा भाविकांची संख्या वाढल्याने दर्शन रांगही लांबली आहे. दर्शन रांग गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेजच्या जवळ पोहोचली आहे.

दर्शन रांग १२ किमी दूर गेली असली तरी मंदिरे समितीने दर्शनरांगेचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे भाविकांचा दर्शनरांगेतील प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित व जलद होत आहे. १८ ते २० तासात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

दर्शनरांगेत भाविकांच्या सोयीसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक व माहिती फलक, भक्तीसंगीतासाठी अत्याधुनिक ध्वनीप्रणाली, लाईव्ह दर्शनासाठी एलईडी व्हॅन व एलईडी टीव्ही, हरवले-सापडले केंद्र, फॅब्रिकेटेड शौचालये, जेटिंग व सक्शन मशिनद्वारे स्वच्छता व्यवस्था, आयसीयू व प्रथमोपचार केंद्र, पुरेसा वैद्यकीय कर्मचारी, सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली, विश्रांती कक्ष, बसण्याची व्यवस्था, आपत्कालीन मार्ग, अग्निशमन व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र, अत्याधुनिक विद्युत व्यवस्था तसेच फॅन व कूलरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच अन्नदानेश्वर महाराज व जळगाव सेवा समिती यांच्या माध्यमातून २४ तास अन्नदान सुरू होत असून, मंदिर समितीमार्फत भाविकांना मिनरल वॉटर, चहा, तांदळाची खिचडी व साबुदाणा खिचडी मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. दर्शनरांगेतील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची उड्डाणपुलेही उभारण्यात आली आहेत.

दर्शनरांगेत कायमस्वरूपी ४ व अतिरिक्त १६ अशा एकूण २० पत्राशेडची निर्मिती करण्यात आली आहे. अतिरिक्त पत्राशेडपैकी कायमस्वरूपी पत्राशेडच्या अगोदर ६, त्याच्या शेजारी २ आणि श्री लक्ष्मण पाटील मंदिर ते गोपाळपूर या मार्गावर ८ पत्राशेड उभारण्यात आले आहेत. सलग पत्राशेडमुळे हवा खेळती राहत असून दर्शनरांग अधिक वेगाने पुढे सरकत आहे. तसेच भाविकांचे ऊन व पावसापासून संरक्षण होत आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन पत्राशेडच्या पुढील व मागील बाजूस पुरेशी मोकळी जागा ठेवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news