

उमरगा: शहरातील सराफा बाजारातील सराफ व्यापार्याला चोरी केलेले सोने चोरट्यांनी विक्री केल्याच्या संशयावरून कर्नाटकातील पोलिस पथकासोबत मंगळवारी (दि २४) दुपारच्या सुमारास स्थानिक व्यापाऱ्यांनी चांगलाच वाद घातला. यामुळे सराफ बाजारपेठेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
कर्नाटक राज्यातील बेटागिरी (जि गदग) येथे चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी याचा तपास करीत चोरट्यांना अटक केली होती. चोरीच्या घटनेतील चोरट्यांनी चोरीचे सोने उमरगा सराफ लाईन मध्ये एका सराफ व्यापाऱ्याला विक्री केली असल्याची कबुली दिली. त्यानुसार कर्नाटक पोलिसांचे पथक एका खासगी चारचाकी वाहनातून चोरट्यांसह उमरगा येथे दाखल झाले.
संबंधित घटनेची स्थानिक पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर पथकातील अधिकार्यांनी सराफा व्यापाऱ्याकडे चौकशी केली असता चोरट्याकडून पाच ग्रॅम सोने घेतल्याचे व्यापाऱ्यांने कबूल केले ; परंतु पथकातील अधिकाऱ्यांनी १३ ग्रॅम सोने विक्री झाल्याचा दावा केला. ८ ग्रॅम सोन्याचा फरकावरून पोलीस पथक आणि सराफा व्यापार्यात चांगलीच खडाजंगी झाली. आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून कर्नाटक पोलीस पथक व सराफा व्यापाऱ्यांना उमरगा पोलिस ठाण्यात बोलावून चर्चा झाली. अखेर १३ ग्रॅम सोने कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
त्यानंतर चोरट्याने चोरीतील उर्वरित सोने एका गोल्ड लोन फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवल्याची माहिती दिली. चोरट्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस पथक चौकशी करीता संबंधित फायनान्स कार्यालयात गेले असता वाद आणखी चिघळला. व्यापारी महासंघ आणि सराफ व्यापारी संघटनाचे पदाधिकारी एकत्र येत कर्नाटक पोलिसांची खासगी कार अडवत घेराव घातला. त्यामुळे वातावरणात चांगलाच तणाव निर्माण झाला. यावेळी उमरगा पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी चोरीच्या तपासातील पोलिस पथकाला व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
विधानसभेत गाजलेले प्रकरण पुन्हा चर्चेत; सराफाकडून चोरीचे सोने खरेदी उघड!
कर्नाटक पोलिसांकडून चोरीचे सोने विक्रीच्या नावाखाली येथील सराफा व्यावसायिकांना त्रास दिला जात असल्याचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेमध्ये उपस्थित झाला होता. यापूर्वी कर्नाटक पोलिस पथक सराफा बाजारात आल्यानंतर व्यापाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. मात्र मंगळवारी परिस्थिती वेगळी ठरली. एका सराफा व्यावसायिकाने चोरीचे सोने खरेदी केल्याचे मान्य करत संबंधित सोने पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे चोरीच्या सोन्याची खरेदी उघड झाली असून बाजारपेठेत याबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.