

पाचगणी : पाचगणी-महाबळेश्वरला होणारा पाणीपुरवठा मुख्यत्वे वेण्णा लेकमधून होत असून वाढत्या उष्णतेमुळे येथील पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्यामुळे पाचगणी शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या वेण्णा लेकमध्ये सुमारे 20 एमसीएफटी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे टंचाईला पाचगणीकरांना तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे पर्यटननगरीवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे.
पाचगणी शहरात घरगुती व व्यावसायिक मिळून सुमारे 2 हजार 600 हून अधिक नळजोडण्या असून दररोज सरासरी 18 ते 20 लाख लिटर पाणी वितरण केले जाते. एप्रिल-मे महिन्यांत पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता पाण्याची मागणी वाढत असून उपलब्ध साठ्यावर ताण निर्माण झाला आहे. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने आगाऊ उपाययोजना सुरू केल्या आहेत. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी साठवण्यासाठी नियोजन करावे लागत आहे. काही भागांत पाण्याअभावी अडचणी वाढल्या असून महिलांना मर्यादित वेळेत पाणी भरावे लागत आहे. पाईपलाईन फुटणे व दुरुस्तीच्या कामांमुळे काहीवेळा पाणीपुरवठा तात्पुरता विस्कळीत होत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे.
दरम्यान, या परिस्थितीचा परिणाम पर्यटन व्यवसायावरही होऊ लागला आहे. हॉटेल, लॉज व होमस्टे व्यावसायिकांना टँकरद्वारे पाणी मागवावे लागत असून खर्चात वाढ होत आहे. परिणामी पर्यटन व्यवसायावर आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. गळती रोखणे, अनावश्यक वापर टाळणे आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.