

धाराशिव : तालुक्यात यंदा अनेक गावांत अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन पीक असे पिवळे पडू लागले आहे.
धाराशिव : जिल्ह्याने सलग तिसऱ्या वर्षी पावसाची वार्षिक सरासरी गाठली आहे. यंदाही सरासरीपेक्षा अधिक पावसाचे रेकॉर्ड होणार हे स्पष्ट झाले आहे. १८ तारखेपर्यंत जिल्ह्यात ६६०. मिमी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या हे प्रमाण १०९.६ टक्के इतके आहे.
साधारण २०२२ या वर्षाचा अपवाद वगळता मागील सहा ते सात वर्षांपासून जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात जिल्ह्यात ६०३.१ मिमी पावसाची वार्षिक सरासरी आहे. हा शंभर टक्के पाऊस झाला तर बहुतांश प्रकल्प भरले जातात. त्यामुळे रब्बी पिकांना मोठा फायदा होत असतो. मागील काही वर्षांत सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होत असल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान होत असले तरी उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे.
यंदा अतिवृष्टीने तुळजापूर तसेच धाराशिव तालुक्यांत अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. वाशी आणि लोहारा, उमरगा या तीन तालुक्यांत यंदाही १२० मिमीच्या पुढे पाऊस झाला आहे. गुरुवारी (दि. १८) सकाळी ८ वाजता घेतल्या नोंदीनुसार तालुकानिहाय झालेला पाऊस असा. (कंसात सरासरी पाऊस) : धाराशिव - ६१५ (६३६.६), तुळजापूर - ७०२.१ (६५३), परंडा - ५१७.५ (४७२), भूम - ६४२.१ (५८०), कळंब - ७०९.३ (६३०), उमरगा - ७०२.५ (५६५.५), लोहारा - ६६२.३ (५४४.१) आणि वाशी ८१३.५ (६४१.२). गेल्या वर्षी याच दिवशी ६२६.४ मिमी पाऊस नोंदला गेला होता.
या पावसामुळे जिल्ह्यातील तेरणा, लोअर तेरणा, सीना कोळेगाव, मांजरा, चांदणी, बोरी आदी प्रकल्प तुडुंब भरले असून छोटे मोठे तलावही ओसंडून वाहत आहेत. या जोरदार पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून अनेक शिवारे पाण्याखाली असल्याने हे पीक पिवळे पडू लागले आहे.