

Vaishnavi Babar kabaddi championship
भूम: भूम शहर व तालुक्यातील कबड्डी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भूम येथील स्वराज स्पोर्ट्स क्लबची प्रतिभावान खेळाडू वैष्णवी बाबर हिने राज्य शालेय कबड्डी संघासाठी झालेल्या निवड चाचण्यांत उत्तुंग कौशल्य, दमदार बचाव आणि भेदक चढाया सादर करत राज्याच्या अंतिम संघात स्थान मिळवले आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र शालेय कबड्डी संघात स्थान मिळवणारी वैष्णवी ही भूम तालुक्यातील पहिलीच खेळाडू ठरली आहे, ही भूमसाठी अभिमानाची बाब आहे.रविंद्र हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या वैष्णवीच्या नैसर्गिक खेळगुणांना पैलू पाडण्याचे उल्लेखनीय काम क्रीडाशिक्षक तथा NIS कोच अमर सुपेकर यांनी केले आहे. तिच्या या यशाबद्दल पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त केले असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही वैष्णवी नक्कीच चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्वराज स्पोर्ट्स क्लबच्या कबड्डी संघाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून या वर्षी महाराष्ट्र संघात निवड होणारी वैष्णवी ही क्लबमधील पाचवी खेळाडू ठरली आहे. शिक्षक, पालक तसेच भूम शहरातील नागरिकांकडून वैष्णवी बाबरवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून तिच्या कामगिरीने सर्वत्र कौतुक केले जात आहे.