

Bhoom Panchayat Committee Engineer Attack
भूम : भूम पंचायत समितीच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गाडीवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास ईट–जातेगाव रोडवरील किनारा हॉटेलजवळ ही घटना घडली.
या हल्ल्यात रोजगार हमी योजनेचे कंत्राटी अभियंता रवींद्र राख व संगणक ऑपरेटर कृष्णा बांगर गंभीर जखमी झाले असून, राख यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बीड येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर बांगर यांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही कर्मचारी शेतकऱ्यांच्या विहिरी व अन्य विकासकामांची पाहणी करून परतत होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या चार जणांनी त्यांच्या गाडीला अडवले. “तुमच्याकडे काम आहे” असे सांगून गाडी थांबवून प्रथम खोऱ्याच्या दांड्याने हल्ला करण्यात आला. त्यानंतर तलवार व कुऱ्हाडीने वार करून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली.
या घटनेमुळे पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोर कोण हे अद्याप समजू शकले नसून वाशी पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.