

Dharashiv flood
धाराशिव : परंडा तालुक्यातील वडनेर येथे अतिवृष्टीमुळे पूर आला आहे. सोमवारी या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व २ वर्षाचा मुलगा व इतर २ व्यक्ती रात्री २ वाजल्यापासून अडकले होते. पूर्ण पाण्याने वेढलेल्या त्यांच्या घरावर अन्न व पाण्यविना मदतीची वाट पाहत होते. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एनडीआरएफचे जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका केली.
मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगरसह इतरही जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले आहे. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी जीवित व वित्तहानी झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून विभागातील तब्बल ७५ हून अधिक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी होऊन हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान आणि घरांची पडझड झाली. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन रस्ते बंद झाले आहेत. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एका बचावकार्याची माहिती दिली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, वडनेर (ता. परंडा) येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व २ वर्षाचा मुलगा व २ व्यक्ती रात्री पूर्ण पाण्याने वेढले होते व स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने बसले होते. एनडीआरएफच्या जवांनाच्या मदतीने या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी सोमवारी संध्याकाळी ८ वाजता यश आले. या कार्यात एनडीआरएफच्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडले, असे त्यांनी सांगितले.