

Despite repeated requests to the Guardian Minister, there is no response to the fund: MLA. Praveen Swami
उमरगा, पुढारी वृत्तसेवा विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे वारंवार निधीची मागणी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप आ. प्रवीण स्वामी यांनी शुक्रवारी (दि १८) प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार प्रवीण स्वामी यांच्या गैरहजेरी वरुन मतदार संघात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. यांवर आमदार प्रवीण स्वामी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विरोधी पक्षाचा आमदार असल्याने सत्ताधाऱ्यांकडून मतदार संघाला निधी देताना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी पेक्षा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि विकासाच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या 'तुमसे ना हो पायेगा' जनआंदोलनाला प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डीपीडीसीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या आमदारांचे म्हणणे सत्ताधाऱ्यांकडून ऐकून घेतले जाते; मात्र मागितलेला निधी प्रत्यक्षात उपलब्ध करून दिला जात नाही. मतदारसंघाचा विकास आणि जनतेच्या मूलभूत गरजांसाठी मागितलेला निधी असतानाही केवळ विरोधक म्हणून तो रोखला जात असल्याचा दावा स्वामी यांनी केला.
मराठवाड्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी आणि विकासाचा अनुशेष याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ ते १७ सप्टेंबर दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने 'तुमसे ना हो पायेगा' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार अंबादास दानवे यांच्यासह मराठवाड्यातील पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, ३७ भूकंपग्रस्त गावांसाठी विशेष निधी, माकणी धरणाच्या कालव्यांची दुरुस्ती, कोळसूर-तुरोरी जोड कालवा, अपूर्ण सिंचन प्रकल्प, उद्योगधंदे, पर्यटन विकास आणि मराठवाडा वॉटर ग्रीड आदी प्रश्नांवरही आंदोलनादरम्यान विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्याशी चर्चा करण्यात आली. डीपीडीसीच्या एका बैठकीपेक्षा मराठवाड्यातील शेतकरी, बेरोजगार युवक आणि विकासाच्या अनुशेषासाठी सुरू असलेले आंदोलन अधिक महत्त्वाचे होते. सरकारचे लक्ष दुष्काळ आणि विकासाच्या प्रश्नांकडे वेधण्यासाठी जनआंदोलनात सहभागी झाल्याचे आमदार स्वामी यांनी स्पष्ट केले.