

रत्नापूर : वाशी तालुका परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सटवाईवाडी येथील पाझर तलावाच्या बांधाला भगदाड पडले आहे. यामुळे तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून, कळंब तालुक्यातील रत्नापूर व टेकाळे वस्ती पानगाव या तिन्ही गावांना धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर परिस्थितीची माहिती येरमाळा मंडळ अधिकारी नागटिळक यांनी तातडीने कळंब तहसीलदार व वाशी तहसीलदार यांना दिली आहे. दरम्यान, रत्नापूरचे सरपंच सुनील वाघमारे व पोलीस पाटील सुशेन पाटील यांनी गावातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, अशी सूचना ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आली आहे.
स्थानिक प्रशासन व बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून, तलावातील पाणी नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तलाव फुटल्यास मोठ्या प्रमाणात शेती व घरांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक अफवा न पसरवता प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.