Dharashiv News : धाराशिव शहरात कडकडीत बंद; दिल्लीतील घटनेचा निषेध

वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला धाराशिव शहरात गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Dharashiv News
धाराशिव शहरात कडकडीत बंद; दिल्लीतील घटनेचा निषेधfile photo
Published on
Updated on

Complete shutdown in Dharashiv city; protest against the Delhi incident

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला धाराशिव शहरात गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शहरातील बहुतांश बाजारपेठा दिवसभर बंद राहिल्या, तर अत्यावश्यक सेवा आणि सार्वजनिक वाहतूक सुरू होती. सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला. त्यामुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाटाचे चित्र होते.

काही शाळा व महाविद्यालयांवरही बंदचा परिणाम दिसून आला. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान, उमरगा, वाशी, परंडा, तुळजापूर, कळंब, भूम आणि लोहारा येथेही विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली.

Dharashiv News
Beed Crime : चार वर्षांच्या मुलीसह विवाहितेने जीवन संपवले

दगडफेकीमुळे तणाव

दरम्यान, धारासूरमर्दीनी कमानीजवळ गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास दोन गटांत दगडफेकीचा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक रितू खोकर अन्य पोलिस अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाल्या. घडलेल्या प्रकाराचा आढावा घेत त्यांनी पोलिसांची कुमक बोलावून घेतली. त्यानंतर परिसरात शांतता पसरली. हा प्रकार दोन गटांतील वैयक्तिक कारणातून झाल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यावेळी घोषणाबाजी

मुरूम येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांच्या वाहनांचा ताफा मुख्य चौकात आल्यानंतर काही आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यावेळी परिसरात काही काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Dharashiv News
Beed News : विद्यार्थी आंदोलनाला जिल्हा बंदने पाठिंबा

बुधवारी रात्रीही काढली होती समर्थन फेरी

दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुधवारी रात्री धाराशिव शहरात पावसात फेरी काढण्यात आली होती. या फेरीत आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील नागरिक, युवक-युवती सहभागी झाले होते.

logo
Pudhari News
pudhari.news