Beed News : विद्यार्थी आंदोलनाला जिल्हा बंदने पाठिंबा

बाजारपेठा बंद; विद्यार्थी, कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
Beed News
Beed News : विद्यार्थी आंदोलनाला जिल्हा बंदने पाठिंबाfile photo
Published on
Updated on

beed District bandh supports student protest

बीड, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला बीड जिल्ह्यात पाठिंबा मिळाला. गेवराई, बीड, धारूर, माजलगाव, वडवणी, अंबाजोगाई, परळी, केज, पाटोदा, आष्टी व शिरूर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यासह विद्यार्थी व सर्वपक्षीय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी मोर्चा काढून बंदचे आवाहन करण्यात आले तसेच प्रशासनास निवेदन देखील सादर करण्यात आले.

Beed News
Jalna News : मालवाहतूक ट्रक शहरातून सुसाट

गेवराई : शहरात करण्यात आलेल्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. विष्णू जाधव, अजयकुमार गायकवाड, राजेंद्र पोकळे, ज्ञानेश्वर हवाले, किशोर भोले, किशोर चव्हाण, अमोल सुतार, देवेंद्र दुरधरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब राठोड, राजेंद्र मोटे, उमेश परदेशी, अख्तर शेख, दलित पँथरचे युवा राज्याध्यक्ष छगन खरात आदी उपस्थित होते.

केज : शहरामध्ये बाबासाहेब मस्के, धनराज सोनवणे, प्रा. बळीराम सोनवणे, अमोल हजारे, शरद धिवार, लिबराज गायकवाड, प्रवीण मस्के यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते आणि महिला यांनी रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले, या आवाहनाला व्यापारी आणि छोटे व्यावसायिक यांनी प्रतिसाद देत सर्व व्यवहार बंद ठेवले.

Beed News
Jalna Crime News : वारकऱ्यांचा वेश घेऊन पोलिसांनी केले खुनातील आरोपीस जेरबंद

त्यानंतर तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. भविष्यात विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचा दडपशाहीचा वापर होणार नाही, याची शासनाने हमी घ्यावी, राजीनामा द्यावा या मागण्यांचा समावेश आहे.

व्यापाऱ्यांचा बंदला प्रतिसाद

थारूर: नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला गुरुवारी धारूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले, किरकोळ दुकाने तसेच विविध व्यावसायिक आस्थापना पूर्णपणे बंद राहिल्याने शहरात कडकडीत बंदचे चित्र पाहायला मिळाले. बंदच्या आवाहनाला व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीन प्रतिसाद दिल्याने धारूर शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि व्यापारी परिसर दिवसभर ओस पडले होते. नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. यावेळीवंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रशांत उघडे शहराध्यक्ष आकाश गायसमुद्रे, रानबा उजगरे, बाबुराव मस्के, अनिल गायकवाड, बाळासाहेब उजगरे, आदित्य गायसमुद्रे, अजय गायसमुद्रे, अजय गायसमुद्रे, विनायक शिरसाठ, धीरज गायसमुद्रे, संदीप गायसमुद्रे, राज सरवदे, अजिंक्य वाघमारे, गणेश वाघमारे, राज शिरसाट, करण शिस्साठ, कपिल शिरसाट, जिजा शिरसाट, सह भीमसैनिक धारूर शहरातील नागरिक उपस्थित होते.

वडवणी कडकडीत बंद

वडवणी: वडवणी शहरात विविध विद्यार्थी, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांच्या वतीने बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयावर भव्य 'विद्यार्थी जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आला. मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी विद्यार्थिनींच्या हस्ते तहसीलदारांमार्फत देशाचे पंतप्रधान यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारताना वडवणी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे उपस्थित होत्या. दरम्यान, आंदोलनादरम्यान सरकारविरोधी घोषणांनी तहसील परिसर आणि वडवणी शहर परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांनी हातात फलक, बॅनर आणि घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. या जनआक्रोश मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवती, महिला, पालक, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कामगार, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, डॉक्टर, वकील, पत्रकार तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अखेरीस सामूहिक राष्ट्रगीत गायनाने मोर्चाचा समारोप करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news